दोन पक्षप्रमुखांना घडवणारी शिक्षिका हरपली, उद्धव-राज ठाकरेंच्या ‘बाईं’चं 92 व्या वर्षी निधन

| Updated on: Mar 14, 2022 | 1:39 PM

सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांना शिक्षणाचे धडे दिले आहेत. आधी पतीचं छत्र हरवलं, नंतर मुलालाही काळाने हिरावलं. सध्या त्या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ फाऊंडेशन” या वृद्धाश्रमात वास्तव्य करत होत्या.

दोन पक्षप्रमुखांना घडवणारी शिक्षिका हरपली, उद्धव-राज ठाकरेंच्या बाईंचं 92 व्या वर्षी निधन
राज-उद्धव ठाकरेंच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचं निधन
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

वसई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या बालपणीच्या शिक्षिका सुमन रणदिवे (Suman Randive) यांचे निधन झाले. मुंबईजवळच्या वसई येथील सत्पाला भागात न्यू लाईफ फाऊंडेशन या वृद्धाश्रमात रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमन रणदिवे गेल्या 2 वर्षांपासून आपल्या वसईतील वृद्धाश्रमात राहत होत्या. तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झाल्यामुळे रणदिवे बाईंनी मदतीची याचना करण्यासाठी राज ठाकरेंना फोन केला होता. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर सत्पाला येथील स्मशानभूमीत आश्रमाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोण होत्या सुमन रणदिवे?

सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांना शिक्षणाचे धडे दिले आहेत. आधी पतीचं छत्र हरवलं, नंतर मुलालाही काळाने हिरावलं. सध्या त्या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ फाऊंडेशन” या वृद्धाश्रमात वास्तव्य करत होत्या. गेल्या वर्षी मे महिन्यात या वृद्धाश्रमाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला होता.

राज ठाकरेंचा फोन

वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झाल्यानंतर रणदिवेंनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील यांच्याकडे मदतीची याचना केली होती. ‘टीव्ही9 मराठी’च्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय तसेच राज ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली. राज ठाकरे यांनी फोनवरुन रणदिवेंशी संवादही साधला होता.

काय झाला होता संवाद?

सुमन रणदिवे : राजा
राज ठाकरे : हा नमस्कार कशा आहात?
सुमन रणदिवे : मी सुमनताई रणदिवे, वसईहून बोलतेय, तुमच्या घरी यायचे माहितेय ना ट्यूशनला वगैरे…
राज ठाकरे : हो हो, काय त्रास झाला, काय प्रॉब्लेम आहे?
सुमन रणदिवे : मध्यंतरी तू क्रिकेट मैदानाला आला होतास, पण त्या लोकांनी मला तुझी भेट दिली नाही. आमचं खूप नुकसान झालंय, जरा जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढं बघ ना
राज ठाकरे : मी आमच्या अविनाश जाधव यांना सांगितलं आहे, ते सर्व प्रकारची मदत करतील. त्यामुळे काही काळजी करु नका, तब्येत वगैरे सगळं ठीक आहे ना?
सुमन रणदिवे : हो ठीक आहे, कुंदाताई काय म्हणत आहेत?
राज ठाकरे : आई बरी आहे
सुमन रणदिवे : ए तू ये ना एकदा मला भेटायला
राज ठाकरे : येतो, मी येतो, लॉकडाऊन वगैरे संपलं की भेटू
सुमन रणदिवे : नक्की, प्रॉमिस?
राज ठाकरे : हो नक्की

मे 2021 मध्ये राज ठाकरे आणि सुमन रणदिवे यांच्यात झालेल्या संवादाची क्लीप :

संबंधित बातम्या 

उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला, 90 वर्षीय शिक्षिकेची आर्त हाक

TV9 Impact : 90 वर्षीय शिक्षिकेची मदतीसाठी हाक, विद्यार्थी राज-उद्धव यांचे तातडीने रणदिवे बाईंना फोन

राजा, आमचं खूप नुकसान झालंय, सुमनताईंचा फोन, राज ठाकरे म्हणाले काळजीच करु नका