हुश्श… मोठा दिलासा! ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95 टक्क्यांवर

| Updated on: May 17, 2021 | 4:49 PM

राज्यात कोरोनाचं संकट वाढलेलं असतानाच एक दिलासादायक बातमी आहे. (corona patients recovery rate increased in thane)

हुश्श... मोठा दिलासा! ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95 टक्क्यांवर
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

ठाणे: राज्यात कोरोनाचं संकट वाढलेलं असतानाच एक दिलासादायक बातमी आहे. ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95 टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. (corona patients recovery rate increased in thane)

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ठाणे शहरातील बाधित रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने तात्काळ योग्य उपचार देण्यात येत आहेत. महापालिकेच्यावतीने शहरात चाचण्यांची वाढविलेली संख्या तसेच कोरोना रुग्णालयातील उपचारांच्या सकारात्मक परिणामाने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असून आतापर्यंत एकूण आजपर्यंत 1,20,976 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. कोविड रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होवून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधानकारक असून योग्य उपचारामुळे जास्तीत जास्त बाधित रुग्ण बरे होत आहेत, असं आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

ठाणेकरांना सारथीचा हात

दरम्यान, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ‘सारथी’ प्रकल्प अर्थात महापालिका कोविड कॅाल सेंटर कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातंर्गत रोज सरासरी 100 लोकांचे तज्ज्ञ डॅाक्टर्सच्या माध्यमातून वैद्यकीय समुपदेशन करण्यात येत असून आतापर्यंत 2 हजार 200 लोकांचे वैद्यकीय समुपदेशन करण्यात आले आहे. यामध्ये 29 टक्के सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले, 23 टक्के रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी संदर्भांकित करण्यात आले. 20 टक्के लोकांचे तज्ज्ञ डॅाक्टर्सच्यामाध्यमातून टेलिकौन्सीलिंग करण्यात आले तर 14 टक्के रुग्णांच्या आरोग्य स्थितीचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये शहरातील काही खासगी डॉक्टर्सदेखील टेलि कौन्सिलिंगसाठी निशुल्क सेवा देत आहेत.

असे चालते काम

शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, गृह विलगीकरणांमधील रुग्णांचे योग्य वेळी समुपदेशन करून त्यांचे मनोबल वाढविणे, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर आवश्यकता भासल्यास उपचार करणे, गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची प्रकृती खालावत असल्यास त्यास रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी कोविड वॅार रुमला कळविणे आणि त्या रुग्णांवर वेळीच उपचार होतील याची दक्षता घेणे यासाठी 22 एप्रिल, 2021 रोजी ‘सारथी’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. रोज प्राप्त होणाऱ्या रुग्णांची माहिती, गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची, कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची माहिती या कोविड कॅाल सेंटरला पाठविली जाते. त्या माहितीच्या आधारे सारथी कोविड कॅाल सेंटरमधून प्रत्येकाला 15 दिवसांपर्यंत रोज कॅाल करून त्यांची माहिती घेतली जाते. त्यांच्या आरोग्याची माहिती घेवून त्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरविली जाते.

तज्ज्ञ डॅाक्टरांचे पॅनल

यासाठी महापालिकेच्यावतीने तज्ज्ञ डॅाक्टरांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. या डॅाक्टरांच्या मदतीने ज्या रुग्णांना वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशनाची गरज आहे त्यांना टेलि कौन्सिलिंगच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यात येतो. ज्यांना किरकोळ उपचाराची गरज आहे त्यांच्यावर गृह विलगीकरणामधील रुग्णांवर उपचार करण्यात येतात, तर लक्षणे गंभीर स्वरुपाची वाटत असल्यास त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याविषयी महापालिकेच्या वॅार रुमला कळविण्यात येते. या कॅाल सेंटरच्या माध्यमातून रोज जवळपास 100 लोकांशी संवाद साधून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येते. या कॅाल सेंटरच्या माध्यमातून 16 मे अखेरपर्यंत एकूण 2200 लोकांचे वैद्यकीय समुपदेशन करण्यात आले. (corona patients recovery rate increased in thane)

 

संबंधित बातम्या:

कोरोनाचं संकट कायम, अजून आणखी लाटा येणार, भारतासाठी 6-18 महिने चिंतेचे; WHOच्या शास्त्रज्ञाचा इशारा

Maharashtra Coronavirus LIVE Update : उस्मानाबाद जिल्हा कारागृहात तब्बल 133 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

Working Hours | आठवड्याचे सहा दिवस नऊ तासांची शिफ्ट, हृदयरोगाला आमंत्रण, WHO ने बजावले

(corona patients recovery rate increased in thane)