गणपती उत्सवात जादा वाहतूक करूनही एसटीला झाला मोठा तोटा, पाणी नेमकं मुरतंय कुठे !

| Updated on: Feb 06, 2023 | 8:35 AM

कोरोनाकाळापूर्वी एसटी महामंडळाला 20 ते 22 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळत होते. आता ते तेरा कोटीपर्यंत घसरले आहे. पोलीस, आरटीओ अधिकाऱ्यांचे 'वडाप' सारख्या अनधिकृत वाहनांना अभय असल्यानेच एसटी गाळात चालल्याचा आरोप होत आहे.

गणपती उत्सवात जादा वाहतूक करूनही एसटीला झाला मोठा तोटा, पाणी नेमकं मुरतंय कुठे !
MSRTC (1)
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठे योगदान असलेली राज्याची जीवनवाहीनी एसटी ( MSRTC ) अनेक कारणांनी अडचणीत आली आहे. एसटीचा संचित तोटा अंदाजे साडे बारा हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सध्या एसटीचे दिवसाचे सरासरी उत्पन्न तेरा ते चौदा कोटींवर आले आहे. एसटीने ( ST ) हुकमी उत्पन्न मिळविण्यासाठी गणपती उत्सवात अडीच हजाराहून अधिक फेऱ्या चालविल्या. अंदाज होता कि एसटीची कमाई वाढेल. परंतू एसटीचे उत्पन्न घटल्याचे उघडकीस आले आहे. आणि ज्या दिवसात आरटीओ ( RTO ) आणि वाहतूक पोलीसांनी रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत बेकायदा वाहनांविरोधात मोहीम राबविली, त्यादिवसात एसटीच्या उत्पन्न अचानक वाढल्याचे एसटीच्या कामगार नेत्याने म्हटले आहे.

एसटीचा आर्थिक गाडा विविध कारणाने घसरला आहे. दिवसाचे सरासरी उत्पन्न तेरा ते चौदा कोटींवर आले आहे. इंधनाचाच खर्च दिवसाला सरासरी साडे अकरा कोटी रुपयांवर गेला आहे. एकंदर जमा खर्च हिशोब केला तर दिवसाला अंदाजे पंधरा कोटी रुपये खर्चाला कमी पडतात. एसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांचा पगार सध्या सरकारच्या मदतीवर होत आहे. परंतू एसटीची सर्व विकास खुंटला आहे. वेतनवाढ थांबली आहे. वैद्यकीय बिले, निवृत कर्मचारी देणी थकली आहेत.

एसटीला सर्वात मोठा फटका हा अवैद्य वाहतुकीमुळे बसत असून वर्षाला अंदाजे 1000 कोटी रुपये इतके आर्थिक नुकसान होत आहे. अशा अनधिकृत ‘वडाप’ सारख्या वाहनांना खतपाणी घालण्याचे काम पोलीस व आर.टी.ओ. अधिकारी करीत आहेत. पोलीस, आरटीओ अधिकाऱ्यांचे ‘वडाप’ सारख्या अनधिकृत वाहनांना अभय असल्यानेच एसटी आर्थिक संकटात असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

जादा गाडया चालवूनही गणपतीत तोटा, वाहन तपासणी मोहिमेत एसटी फायदा

ज्या दिवशी पोलीसांची नाकाबंदी किंवा विशेष तपासणी असते त्या दिवशी एसटीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. गेल्या सहा महिन्यातील आकडेवारी लक्षात घेतल्यास हे स्पष्ट होते. या काळात सरासरी उत्पन्न 17626.91 लाख रुपये इतके आहे. गणपती उत्सव काळात राज्यभर मोठ्या प्रमाणात जादा वाहतूक झाली. रस्त्यावर प्रवाशांची तुफान गर्दी होती. असे असले तरी त्या काळात सरासरी उत्पन्न 15582.11 लाख इतके कमी झाले. ज्या आठवड्यात तपासणी अथवा नाकाबंदी करण्यात आली त्या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढले आहे. एका दिवशी तर एसटीला चक्क 25 कोटी 47 लाख इतके उच्चांकी उत्पन्न मिळाले. तर अचानक काही वेळा चक्क 12 ते 13 कोटी रुपये इतके निचांकी उत्पन्न झाले आहे. पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांनी ठरवले तर एसटी फायद्यात आल्याशिवाय राहणार नाही, असेही श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे .

दर महिन्याला लागते 360 कोटींची सरकारी मदत

राज्य सरकारला वेतनासाठी दर महिन्याला 360 कोटी रुपये एसटी महामंडळा मदत द्यावी लागते. गाड्या घ्यायला व स्थानक नूतनीकरण करण्यासाठी बजेट मध्ये तरतुद करण्यात आली आहे. सरकारला आपल्या वरचा आर्थिक भार कमी करायचा असेल तर फक्त अवैद्य वाहतूक रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. आणि तसे केले तर यापुढे कर्मचाऱ्यांची असलेली प्रलंबित वेतनवाढ या सह सर्व प्रश्न निकाली निघतील व एसटीचा विस्तार होऊन ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर होईल, असा विश्वासही श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला आहे.