कोकणात राजकीय राडा; राणे-नाईक गटात क्षुल्लक कारणावरून धक्काबुक्की आणि मारहाण…

| Updated on: Jan 25, 2023 | 8:06 PM

भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याने भाजपचे कार्यकर्ते संतापून शिवसेनेच्या कार्यालयावर चालून गेले होते. पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखले पण ते भाजपचे कार्यकर्ते सेनेच्या कार्यलयाबाहेरच रस्त्यावर कित्येक तास उभा होते.

कोकणात राजकीय राडा; राणे-नाईक गटात क्षुल्लक कारणावरून धक्काबुक्की आणि मारहाण...
Follow us on

सिंधुदुर्गः सिंधुदुर्ग आणि राजकीय राडे हे प्रकरण तसं जुणेच आहे. गेल्या वर्षभरापासून राजकीय राड्यांनी विश्रांती घेतली होती. मात्र काल पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवलीत राडा पाहायला मिळाला. एका क्षुल्लक कारणावरून भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. हमरी-तुमरी, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाणीमुळे काल पुन्हा एकदा कणकवली पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे आमदार वैभव नाईकही यावेळी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेच्या 25 ते 30 जणांवर व भाजपच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कणकवली तालुक्यातील नेहमीच चर्चेत असलेल्या व आपल्या डॅशिंग कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये कनेडी येथे जोरदार राजकीय वाद झाला.

गोट्या सावंत यांनी सेनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्यावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या सेनेचे कार्यकर्ते सावंत यांच्या पक्ष कार्यालयामध्ये घुसले होते.

यावेळी कार्यालयात एकमेकांना धक्काबुक्कीही करण्यात आली. यानंतर या घटनेची माहिती मिळताच दोन्ही बाजूने कार्यकर्ते या कार्यालय परिसरात गोळा झाले.

त्यानंतर पोलीस पथकासह राज्य राखीव पोलीस पथक आणि शीघ्र कृतीदल घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात या राड्यामध्ये कुंभवडे गावचे शिवसेनेचे माजी सरपंच सूर्यकांत तावडे, गंभीर जखमी झाले.

भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याने भाजपचे कार्यकर्ते संतापून शिवसेनेच्या कार्यालयावर चालून गेले होते. पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखले पण ते भाजपचे कार्यकर्ते सेनेच्या कार्यलयाबाहेरच रस्त्यावर कित्येक तास उभा होते.

याचदरम्यान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी शिव्या देणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर दांडा घेऊन धावून गेले होते. या घटनेनंतर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना रोखले त्यामुळे पुढचा मोठा राडा टळला. आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली आहे

या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेसह भाजपा कार्यकर्त्यानी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार वैभव नाईक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत.

या प्रकरणी कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिवसैनिकांच्या फिर्यादीनुसार भाजपच्या संदेश सावंत यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी यावर बोलताना कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.