राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाण्यात सर्वात मोठी कारवाई, आरोपींमध्ये महिलेचाही समावेश, दीड कोटींचा मद्यसाठा जप्त

| Updated on: Apr 24, 2024 | 9:49 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीवर लक्ष ठेवून असणाऱ्या उत्पादन शुल्क ठाणे विभागाने धडक मोहीम राबवली आहे. आचारसंहिता सुरु झाल्यापासून १६ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत विभागाने केलेल्या कारवाईत १ कोटी ५६ लाख ८४० किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाण्यात सर्वात मोठी कारवाई, आरोपींमध्ये महिलेचाही समावेश, दीड कोटींचा मद्यसाठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाण्यात सर्वात मोठी कारवाई
Follow us on

निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना सर्वच आस्थापनाना प्रशासनाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपल्या सर्व विभागांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागही अॅक्शन मोडवर आला आहे. १६ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत ठाणे विभागात अवैध मद्य निर्मिती, तस्करी, विक्री, वाहतूक अशा प्रकारच्या ३११ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी १८८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, विभागाने केलेल्या कारवाईत १ कोटी ५६ लाख ८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या गुन्ह्यांमधून आत्तापर्यंत 190 आरोपींना अटक केली आहे. तर कारवाईत 9 वाहने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागही सक्रिय झाला आहे.

राज्य उत्पादन शुल्काकडून कडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 नियमित आणि विशेष भरारी पथके तयार केली आहेत. ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येऊन संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच रात्रीची गस्त घालण्यात येत आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्य साठ्यावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहीत वेळत चालू नसल्यास आणि काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, तस्करी, वाहतूक आणि विक्रीवर विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचे आमिष दाखवून मतदान होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असल्याचा देखील निलेश सांगळे यांनी सांगितल आहे.