बीडमध्ये मुक्या प्राण्यांना आसरा देणाऱ्या छावणी चालकाची मिरवणूक

| Updated on: Jun 05, 2019 | 3:10 PM

चारा छावणी आणि भ्रष्टाचार हे जणू एकच समीकरण तयार झाले आहे. मात्र, बीडमधील एक चारा छावणी याला अपवाद ठरली आहे.

बीडमध्ये मुक्या प्राण्यांना आसरा देणाऱ्या छावणी चालकाची मिरवणूक
Follow us on

बीड : चारा छावणी आणि भ्रष्टाचार हे जणू एकच समीकरण तयार झाले आहे. मात्र, बीडमधील एक चारा छावणी याला अपवाद ठरली आहे. गुरांना भरपेट खाद्य आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या छावणीच्या चालकाची शेतकऱ्यांनी चक्क घोड्यावर बसवून वाजत-गाजत मिरवणूक काढली.

ही चारा छावणी बीडपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरद खालसा या गावात आहे. छावणीत सध्या जवळपास 600 गुरे आहेत. छावणी चालक कचरू जाधव यांनी व्यवहार बाजूला ठेवून मुक्या गुरांना भरपेट खाद्य आणि प्यायला स्वच्छ पाणी दिले. एवढेच नाही, तर गेल्या अडीच महिन्यात एकदाही पशु खाद्य देण्यात खंड पाडला नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे शेतकऱ्यांना त्यांचा प्रामाणिकपणा आवडला. त्यानंतर या शेतकऱ्यांनी चक्क घोडा सजवून आणला आणि छावणी चालक कचरू जाधव यांची वाजतगाजत छावणीतून मिरवणूक काढली.

‘दोन वेळाचे पशुखाद्य आणि 24 तास पिण्याचे पाणी’

मुक्या गुरांची परवड होऊ नये म्हणून कचरू जाधव आणि त्यांच्या 3 मित्रांनी एकत्रित येत ही चारा छावणी उभी केली. या छावणीत दोन वेळाचे पशुखाद्य आणि 24 तास पिण्याचे पाणी देण्यात आले. आपल्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती शेतकरी अशा पद्धतीने देतील याची छावणी चालक कचरु जाधव यांना पुसटशीही कल्पना नव्हती. शेतकऱ्यांनी केलेल्या या अनोख्या सत्कारामुळे कचरु जाधव हे आनंदाने पुरतेच भारावून गेले.

भ्रष्टाचाराच्या मार्गावरील छावणी चालकांसांठी आदर्श उदाहरण

बीड जिल्ह्यात सर्वाधिक चारा छावण्या आहेत. त्यात एकीकडे भ्रष्टाचाराचा कित्ता गिरवणे सुरु असतानाच दुसरीकडे कचरु जाधव यांच्यासारखे भगीरथ मुक्या गुरांसाठी प्रामाणिक सेवा देऊन माणुसकी कायम ठेवत आहेत. तसेच इतर भ्रष्टाचाराच्या मार्गावरील छावणी चालकांसमोर एक आदर्श निर्माण करत आहेत.