आली माझ्या घरी ही दिवाळीः लक्ष्मीपूजनासाठी नाशिकमध्ये आली सोन्या-चांदीची नाणी!

| Updated on: Oct 30, 2021 | 3:15 PM

दिवाळीचा सण आनंद, उल्हास घेऊन येतो. बाजारात रौनक वाढते. मोठी उलाढाल होते. धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा...याचा गोडवा काय वर्णावा. हे पाहूनच नाशिकच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीची नाणी आली आहेत.

आली माझ्या घरी ही दिवाळीः लक्ष्मीपूजनासाठी नाशिकमध्ये आली सोन्या-चांदीची नाणी!
नाशिकच्या सराफा बाजारात सोन्याची नाणी विक्रीसाठी आली आहेत.
Follow us on

नाशिकः दिवाळीचा सण आनंद, उल्हास घेऊन येतो. बाजारात रौनक वाढते. मोठी उलाढाल होते. धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा…याचा गोडवा काय वर्णावा. हे पाहूनच नाशिकच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीची नाणी आली आहेत.

कोरोनाचे मळभ हटले आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. गणेशोत्सवाने सारा नूरच पालटून टाकला. त्यानंतर नवरात्रोत्सव आणि आता अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी. नवरात्रोत्सवात देवीच्या चांदीच्या मूर्तीला मागणी होती. आता दिवाळी सोन्याच्या नाण्यांना मागणी आहे. अगदी एक ग्रॅमपासून ही नाणी सराफा बाजारात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ही नाणी 24 कॅरेटची आहेत. त्यामुळे अनेक जण गुंतवणूक म्हणूनही त्यांची खरेदी करतात. विशेषतः धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडव्याच्या पूजनासाठी ही नाणी घेण्याची प्रथा आहे. अनेक व्यापारी दरवर्षी या पूजेसाठी सोन्याच्या नाण्याची खरेदी करतात. यंदाही सोन्याच्या नाण्याची मागणी वाढली आहे, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

मोठी उलाढाल होणार

नाशिकच्या सराफा बाजारात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात मोठी उलाढाल झाली. अनेकांनी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीस प्राधान्य दिले. दसऱ्याचा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. या दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल नाशिकमध्ये झाली. आता काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. दिवाळीच्या पाडव्यादिवशी अनेकजण सोने खरेदी करायला प्राधान्य देतात. दिवाळीच्या चारी दिवसांतही सराफा बाजारात मोठी गर्दी असते. ते पाहता आता व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दिवाळी सणाकडे लागले आहेत. सोबतच येत्या काळात सोन्याचे भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोने 600 रुपयांनी महाग

नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48400 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये नोंदवले गेले. सराफा बाजारात मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49850 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 68000 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46300 रुपये नोंदवले गेले. चांदी किलोमागे 67500 रुपये नोंदवली गेली. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48400 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये, तर चांदी किलोमागे 67500 रुपये नोंदवली गेली

सोन्याच्या-चांदीच्या नाण्यांची दिवाळीमध्ये जास्त मागणी असते. धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा यासाठी अनेकजण ही नाणी खरेदी करतात. अनेकांनी नाण्याची बुकींग करून ठेवली आहे. गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते.
– गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

ऐन दिवाळीच्या तोंडावर BOSCH ने नाशिकमध्ये 730 कामगार काढले; 530 जणांना सक्तीची ‘व्हीआरएस’

पवारांवरील टीकेवरून ‘राष्ट्रवादी’ आक्रमक; भोसलेंना शहरात फिरू देणार नाही, युवक शहराध्यक्ष खैरे यांचा इशारा