मुक्काम आंदोलन सुरूच राहणार, पालकमंत्री यांची मध्यस्थी निष्फळ, धरणाचा वाद काय आहे ?

| Updated on: Nov 25, 2022 | 6:03 PM

कालव्याच्या मुद्द्यावरून दोन वेगवेगळ्या मागण्या होत असल्याने दोन्ही गटाचा मुद्दा रास्त आहे, त्यामुळे भुसे यांनी बैठक घेत यावर तोडगा काढण्याची भूमिका घेतली होती.

मुक्काम आंदोलन सुरूच राहणार, पालकमंत्री यांची मध्यस्थी निष्फळ, धरणाचा वाद काय आहे ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मनोहर शेवाळे, मालेगाव, नाशिक : नाशिकच्या मालेगाव येथील बंदिस्त कालव्यावरुन गावागावात सुरू असलेला संघर्ष अधिकच चिघळत चालला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी अडीच तास मनधरणी करूनही आंदोलन गावकऱ्यांनी आंदोलन मागे न घेतल्याने बंदिस्त कालव्याचा वाद विकोपाला गेला आहे. बोरी आंबेदरी धरण्याच्या बंदिस्त कालव्यावरून मुक्काम आंदोलन वनपट, दहीदि, राजमाणे यासंह पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी धरणाच्या कडेला मुक्काम आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे बंदिस्त कालव्याने लखाने, अस्ताने, झोडगे यांसह पंचक्रोशीतील गावांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे गावागावात बंदिस्त कालव्यावरुन वाद विकोपाला गेला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनाच या प्रकरणी काही गावकऱ्यांनी विरोध केल्यानं भुसे यांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे या बंदिस्त कालव्याचे भूमिपूजनचं भुसे यांनी केल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे.

मालेगाव येथील बोरी आंबेदरी या धरणाच्या कडेला वनपट, दहीदि, राजमाणे यांसह आजूबाजूच्या गावकऱ्यांनी बंदिस्त कालवा न करता खुला कालवा करावा अशी मागणी केली आहे.

त्यासाठी धरणाच्या कडेला गेल्या 19 दिवसांपासून मुक्काम आंदोलन सुरू केले असून शेकडो शेतकरी कुटुंब यामध्ये सहभागी झाले असून बंदिस्त कालव्याला कडाडून विरोध करत आहे.

हे सुद्धा वाचा

तर दुसरीकडे बंदिस्त कालव्याच्या समर्थनार्थ धरणाच्या दुसऱ्या बाजूला लखाने, अस्ताने, झोडगे आजूबाजूच्या गावांना फायदा होणार आहे, बंदिस्त कालव्यामुळे संपूर्ण पाणी मिळणार आहे.

धरणासाठी जमिनी दिल्या आहे, त्यामुळे कालव्यातून जाणाऱ्या पाण्याचा फायदा शेतीसाठी होतो, खुला कालव्यातून झिरपणाऱ्या पाण्यापासून विहिरीला पाणी उतरते त्यामुळे खुला कालवाच ठेवावा अशी मागणी होत आहे.

याच पार्श्वभूमीवर कालव्याच्या मुद्द्यावरून दोन वेगवेगळ्या मागण्या होत असल्याने दोन्ही गटाचा मुद्दा रास्त आहे, त्यामुळे भुसे यांनी बैठक घेत यावर तोडगा काढण्याची भूमिका घेतली होती.

मात्र, पालकमंत्री तथा त्या भागाचे नेतृत्व करणाऱ्या दादा भुसे यांची बैठकही निष्फळ ठरली आहे, त्यामुळे बंदिस्त कालव्याचा मुद्दा अधिकच चिघळला असून भुसे यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला आहे.