‘राज्यात काहीही होऊ शकतं’, महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर एकनाथ खडसे यांचं मोठं विधान

| Updated on: Nov 22, 2022 | 6:50 PM

महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता राज्यात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान एकनाथ खडसे यांनी केलंय.

राज्यात काहीही होऊ शकतं, महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर एकनाथ खडसे यांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये भाषण करताना मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिल्याची चर्चा जोर धरु लागल्यानंतर आता विरोधकही त्याच मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत महत्त्वाचं विधान केलंय. महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता राज्यात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान एकनाथ खडसे यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

“आतापर्यंत रात्रीतून सरकार बदललं, काही सरकार खोक्यांमुळे बदललं, त्यामुळे राज्यात काहीही होऊ शकतं”, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलंय. “मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आमदार बंडखोरी करण्याची शक्यता आहे”, असंदेखील विधान एकनाथ खडसे यांनी केलंय.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

“राज्यात काहीही होऊ शकतं. आतापर्यंत राज्यातील राजकारण पाहिलं तर सरकार बदलले, काही सरकार खोक्यांमुळे बदललं तर काही असंच बदललं, असे चित्र अनुभवात येतंय. त्यामुळे नेमकं काय होईल, याचा अंदाज आता घेणं अवघड आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

“एकवेळ मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यावेळेस फार मोजक्याच लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, इतरांना मिळणार नाही. अशावेळेसे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आमदारांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. आमदारांमध्ये अस्वस्थता बाहेर येण्याची शक्यता आहे”, असा दावा खडसेंनी केला.