लोकसभेच्या 3 जागांवर निवडणूक लढवणारे व्यंकटेश्वर महास्वामी अडचणीत; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

| Updated on: Apr 25, 2024 | 10:34 AM

व्यंकटेश्वर महास्वामीजींनी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूरसह अमरावती आणि नागपूरमध्येही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. एवढंच नव्हे तर त्यांनी कर्नाटकातील विजयपुरातही उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभेच्या 3 जागांवर निवडणूक लढवणारे व्यंकटेश्वर महास्वामी अडचणीत; गुन्हा दाखल होण्याची शक्यता
Follow us on

लोकसभा निवडणुकीत एखादा उमेदवार हा एकाचवेळी जास्तीत जास्त दोन मतदारसंघातच उभा राहू शकतो. मर्यादेचा हा नियम असतानाही सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी दाखल केलेले व्यंकटेश्वर महास्वामी अडचणीत सापडले आहेत. कर्नाटकातील दीपक कटकधोंड ऊर्फ व्यंकटेश्वर महास्वामी यांनी एकाच वेळी दोनपेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

व्यंकटेश्वर महास्वामी यांनी सोलापूरसह अमरावती आणि नागपूरमध्येही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. एवढंच नव्हे तर त्यांनी कर्नाटकातील विजयपुरातही उमेदवारी अर्ज भरला होता. एकाच वेळी चार ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्याची पडताळणी करण्यात येत आहे. याप्रकरणाची चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नमूद केले.

व्यंकटेश्वर महास्वामीजी हे शेजारच्या कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील तीन मतदारसंघ आणि कर्नाटकमधूनही उमेदवारी अर्ज भरला आहे . एका उमेदवाराला जास्तीत जास्त दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची कायदेशीर मुभा आहे. पण व्यंकटेश्वर महास्वामी यांनी चार ठिकाणी उमेदवारी भरल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी आता चौकशी करण्यात येत आहे. मागील 2019 साली सोलापूर लोकसभा निवडणुकीतही त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केला होता. मात्र त्यांना अत्यल्प मतं मिळाल्याने त्यांचं डिपॉजिट जप्त झाले होते.