लातूरमधील पशुधन चाऱ्यासाठी बेहाल, छावण्या अडचणीत, प्रशासन गाफील!

| Updated on: Jun 11, 2019 | 5:34 PM

जिल्ह्यातील पशुधनाला आता चारा छावणीत प्रवेश बंदीचा निर्णय घेण्याची नामुष्की छावणी चालकांवर आल्याची स्थिती तयार झाली आहे. सरकारच्या उदासिनतेमुळे हा कठोर निर्णय घेण्याची वेळ आली, अशी भावना छावणी चालकांनी व्यक्त केली.

लातूरमधील पशुधन चाऱ्यासाठी बेहाल, छावण्या अडचणीत, प्रशासन गाफील!
Follow us on

लातूर: जिल्ह्यातील पशुधनाला आता चारा छावणीत प्रवेश बंदीचा निर्णय घेण्याची नामुष्की छावणी चालकांवर आल्याची स्थिती तयार झाली आहे. सरकारच्या उदासिनतेमुळे हा कठोर निर्णय घेण्याची वेळ आली, अशी भावना छावणी चालकांनी व्यक्त केली. असे असले तरी जिल्हा प्रशासनाला मात्र याचे काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. तरिही एकही चारा छावणी सुरु करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील धसवाडी येथे एका सामाजिक संस्थेने 4 महिन्यांपासून चारा छावणी सुरु केली आहे. सध्या या छावणीला तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासनाची कोणतीही मदत मिळताना दिसत नाही.  या छावणीत जवळपास 1 हजार जनावरे दाखल झाल्याने ही चारा छावणी देखील शेवटची घटका मोजत आहे. सध्या या चारा छावणीत लातूर आणि परभणी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जनावरे आहेत. मात्र, मदत मिळत नसल्याने छावणी चालकांनी आता या जनावरांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जनावरांचं करायचं काय? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करत आहे.

छावणी चालकाला दररोज 80 हजार ते 1 लाख रुपये खर्च

अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे देखील एकच चारा छावणी सुरु आहे. या चारा छावणीत आसपासच्या गावातील शेतकऱ्यांची जवळपास 1 हजार जनावरे दाखल झाली आहेत. सध्या येथे एका जनावराला 4 पेंड्या आणि पाणी याप्रमाणे खाद्य पुरवण्यात येते. त्यासाठी छावणी चालकाला दररोज 80 हजार ते 1 लाख रुपये खर्च येतो. मागणी असूनही प्रशासनाने जिल्ह्यात इतरत्र कुठेही चारा छावणी सुरु केलेली नाही. त्यामुळे पशुधनाच्या खाद्याचा तुटवडा प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचेच चित्र आहे.

…तर जनावरे फुकट भाव विकावी लागली

जिल्हा प्रशासन आणि सरकार लातूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या जलयुक्त आणि इंद्रप्रस्थ अभियानाची कामे यशस्वी झाल्याचा दावा करत आहे. मात्र, वास्तविक पाहता यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने शेतकरी दुष्काळाच्या परिस्थितीतून जात आहे. पाण्याची भीषणता तर सगळीकडेच आहे. शेतकऱ्यांच्या पदरात चारा उरला नाही. त्यामुळे जनावरांना काय देणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. दिव्यज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेली छावणी सुरु नसती तर जनावरे फुकट भाव विकावी लागली असती, अशी प्रतिक्रिया येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.