एकाच व्यक्तीचे दोन भिन्न रक्तगट, महापालिकेच्या क्रस्ना लॅब वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय घडलं ?

| Updated on: Nov 26, 2022 | 9:49 AM

कोरोना काळातही ह्या लॅबने मोठ्या प्रमाणात तपासणी केली आहे, त्यामुळे त्या रिपोर्टवर देखील शंका उपस्थितीत केली जात असून लॅबवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

एकाच व्यक्तीचे दोन भिन्न रक्तगट, महापालिकेच्या क्रस्ना लॅब वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय घडलं ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिक महानगर पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्रस्ना लॅबमध्ये एकाच व्यक्तीला दोन रिपोर्टमध्ये दोन वेगवेगळे रक्तगट दाखवण्यात आले आहे. हा सर्व प्रकार नाशिकच्या नाशिकरोड येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी समोर आणला आहे. नाशिक महानगर पालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये सवलतीच्या दरात लॅब सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये क्रस्ना लॅबच्या माध्यमातून तपासणी करण्यात आलेल्या एका व्यक्तीचे दोन भिन्न रक्तगट तपासणी अहवालात नमूद केले आहे. हीच तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांच्याकडे केली होती. त्यावरून आयुक्तांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून संबंधित लॅबला नोटिस बजावली आहे. खरंतर 2017 मध्ये सुरू करण्यात आलेल्या लॅबवर हे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आरोग्य विभागात चर्चेला उधाण आले असून मागील रिपोर्टबाबत काय ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

विविध चाचण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी महानगर पालिकेच्या वतिने 2017 मध्ये क्रस्ना लॅब सुरू करण्यात आली होती.

मागील आठवड्यात क्रस्ना लॅबमध्ये जेलरोड येथील आशुतोष निकम यांनी रक्तगट तपासणी केली होती, त्यात एबी पॉझिटिव्ह असा रक्तगट असल्याचे निदान झाले होते.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर निकम यांनी दुसरे रक्ताचे संपल देऊन तपासणी केली असता तिथे बी पॉझिटिव्ह दाखवण्यात आले. त्यामुळे निकम यांचा गोंधळ उडाला. आपला रक्तगट नेमका कोणता असा प्रश्न त्यांना पडला आहे.

तर दुसरीकडे असाच प्रकार निकम यांच्यानंतर रामकृष्ण पोरजे यांच्या बाबत घडला आहे. 10 नोव्हेंबरला रक्त चाचणी केल्यानंतर बी पॉझिटिव्ह रक्तगट असल्याचे निदान झाले.

तर दुसऱ्या दिवशी मात्र रक्तगट ओ पॉझिटिव्ह असा रक्तगटाचा अहवाल दाखवण्यात आला होता, त्यामुळे पोरजे यांचाही मोठा गोंधळ उडाला होता, आपला रक्तगट कोणता असा संभ्रम त्यांच्या मनात आहे.

नाशिक महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी मनसेचे शाम गोहाड आणि प्रशांत गांगुर्डे दिलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन लॅबचा अहवाल मागितला आहे लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान कोरोना काळातही ह्या लॅबने मोठ्या प्रमाणात तपासनी केली आहे, त्यामुळे त्या रिपोर्टवर देखील शंका उपस्थितीत केली जात असून लॅबवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.