अहमदाबाद भुयारी मेट्रो प्रकल्प तयार, नवरात्रीत उद्घाटन?; पहिल्यांदाच वापरली ‘ही’ टेक्निक

| Updated on: Sep 10, 2022 | 5:28 PM

अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन होणार आहे आणि अ‍ॅफकॉन्सने आरोग्य आणि सुरक्षितता मापदंडांशी तडजोड न करता प्रकल्प पूर्ण केला आहे. प्रकल्पाने साडे बारा दशलक्ष सुरक्षित मनुष्य तास पूर्ण केले आहेत.

अहमदाबाद भुयारी मेट्रो प्रकल्प तयार, नवरात्रीत उद्घाटन?; पहिल्यांदाच वापरली ही टेक्निक
अहमदाबाद भुयारी मेट्रो प्रकल्प तयार, नवरात्रीत उद्घाटन; पहिल्यांदाच वापरली 'ही' टेक्निक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: अहमदाबाद भुयारी मेट्रो प्रकल्पात (Ahmedabad Underground Metro Project) डायफ्राम वॉल (Diaphragm Wall) शिवाय टनेल बोरिंग मशीन्स (TBM) लाँच करण्यात आल्या आहेत. या मेट्रो प्रकल्पात देशात पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या या पर्यायी पद्धतीमुळे कांकरिया मेट्रो स्टेशनच्या बांधकामाला गती मिळण्यास मदत झाली आहे. तसेच त्यामुळे इतर उर्वरित प्रकल्पासाठी बोगद्याच्या कामाला गती मिळण्यास मदत झाली आहे.

अहमदाबाद मेट्रोच्या भुयारी प्रकल्प -1 मध्ये, दोन भूमिगत स्थानके, एकूण 3.5 किमी लांबीचे जुळे बोगदे, एक कट आणि कव्हर विभाग आणि उन्नत आणि भूमिगत विभागांना जोडणारा रॅम्प बांधण्याचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Afcons Infrastructure Ltd) करत आहे.

कांकरिया स्टेशनसाठी जमीन हस्तांतरणास विलंब व इतर कारणांमुळे हेडवॉल (Headwall) बांधकाम ठप्प झाले होते. या कालावधीत कार्यान्वित होण्यासाठी तयार असलेले पहिले टीबीएम गतीने सुरू होऊ शकले नाही. प्रकल्पाचा विलंब कमी करण्यासाठी आणि कामाला गती देण्यासाठी, प्रकल्प टीमने कांकरिया स्टेशनवर डी-वॉलशिवाय टीबीएम टनेलिंग करण्याची नवीन पद्धत स्वीकारली.

स्टेशनची रुंदी वाढवली

टॉप-डाउन (top-down) बांधकाम पद्धतीमध्ये स्टेशन बॉक्स डी-वॉल हा टीबीएम टनेलिंगच्या आधी बांधला जातो. मात्र कांकरिया स्टेशनवर ते शक्य नव्हते. त्यामुळे ही नाविन्यपूर्ण पद्धती अवलंबली गेली. त्यामध्ये टीबीएमला सामावून घेण्यासाठी स्टेशनची रुंदी 20 मीटर वरून 22 मीटर करण्यात आली.

या नवीन पद्धती विषयी माहिती देताना, प्रकल्प व्यवस्थापक एस नक्किरन म्हणाले, “पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे जाणार्‍या दोन्ही मार्गांसाठी बोगदे सुरू झाले होते. त्यामुळे टीबीएम चे काम लाँचिंग शाफ्टपासून सुरू करण्यात आले. दोन्ही मार्गांचे बोगदे कायमस्वरूपी रिंग बांधून सुरळीत पूर्ण झाले आणि नंतर कालुपूर स्टेशनवर टीबीएम बाहेर काढण्यात आले.” भारतात पहिल्यांदाच मेट्रो प्रकल्पात ही पद्धत वापरण्यात आली. यापूर्वी, इस्तंबूल मेट्रोमध्ये ही पद्धत अवलंबली गेली होती.

टीबीएम (TBM) च्या व्यवस्थित कामाच्या खात्री करण्यासाठी, टीमने अर्थ प्रेशर सेन्सर (earth pressure sensor) साठी इन-हाऊस कॅलिब्रेशन युनिट देखील विकसित केले. “कधीकधी, जेव्हा सेन्सर चिखलाने झाकाळतो तेव्हा सेन्सर्सच्या अर्थ प्रेशरच्या कामामध्ये अडथळे येतात. त्यामुळे त्याचे कॅलिब्रेशन आवश्यक होते. तथापि, प्रत्येक वेळी उत्पादकाकडून कॅलिब्रेशन करून घेणे, किंवा त्यासाठी युनिट भाड्याने देणे खर्चिक आणि वेळखाऊ होते. म्हणून, या समस्येचे निराकरण करण्यासाठी टीमने एक कॅलिब्रेशन युनिट इन हाऊस विकसित केले,” नक्किरन म्हणाले.

कांकरिया स्थानकावरील कामाला गती देण्यासाठी अनुक्रम पद्धतीऐवजी समांतर बांधकाम पद्धतीचा अवलंब करण्यात आला. “आम्ही मुख्य स्टेशन बॉक्सचे बांधकाम नियोजित वेळेपेक्षा चार महिने अगोदर पूर्ण करू शकलो, आणि ओव्हर ट्रॅक एक्झॉस्ट (OTE) डक्टची उभारणी निर्धारित वेळेच्या पाच महिने आधी झाली. गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन (Gujrat Metro Rail Corporation) ने ही या प्रयत्नांचेही कौतुक केलेआहे,” ते पुढे म्हणाले.

अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन होणार आहे आणि अ‍ॅफकॉन्सने आरोग्य आणि सुरक्षितता मापदंडांशी तडजोड न करता प्रकल्प पूर्ण केला आहे. प्रकल्पाने साडे बारा दशलक्ष सुरक्षित मनुष्य तास पूर्ण केले आहेत. तसेच प्रकल्पाला सुरक्षिततेचे विविध पुरस्कार व प्रमाणपत्रे मिळाली आहेत.