मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला, उद्धव ठाकरेही ‘मातोश्री’हून निघाले, शिंदे-ठाकरे भेटीच्या चर्चा, पण…

| Updated on: Nov 09, 2022 | 5:26 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला, उद्धव ठाकरेही मातोश्रीहून निघाले, शिंदे-ठाकरे भेटीच्या चर्चा, पण...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शरद पवार यांना निमोनिया झाल्याने त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. विशेष म्हणजे शिंदे पवारांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेले असताना तिकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्या मातोश्री निवासस्थानावरुन निघाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटीचा हा योग जुळून येणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण एकनाथ शिंदे हे शरद पवारांची भेट घेऊन ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर निघाले आहेत. त्यामुळे ठाकरे-शिंदे भेटीचा योग जुळून येणार नाही हे स्पष्ट झालंय. शिंदेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे कदाचित शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली. मुख्यमंत्री रुग्णालयात दहा मिनिटे थांबले. त्यांनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर ते पवारांचा निरोप घेऊन रुग्णालयाबाहेर आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“शरद पवारांच्या प्रकृतीची मी विचारपूस केली. त्यांच्याशी मी बोललो. त्यांची तब्येत चांगली आहे. निमोनिया देखील रिकव्हर झाला आहे. माझ्याशी खूप चांगलं बोलले. त्यांची तब्येत उत्तम आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उद्या शिबीर आहे. त्यामध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली”, असंदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“शरद पवारांची प्रकृती चांगली आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभावा”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चांगल्या प्रकृतीच्या शुभेच्छा दिल्या.