हिरामणी तिवारी मारहाण आणि मुंडण प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक

| Updated on: Dec 26, 2019 | 11:27 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या हिरामणी तिवारी यांना मारहाण करुन त्यांचं मुंडण करण्यात आलं होतं. याप्रकरणी आता चार शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.

हिरामणी तिवारी मारहाण आणि मुंडण प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या हिरामणी तिवारी यांना मारहाण करुन त्यांचं मुंडण करण्यात आलं होतं (Hiramani Tiwari Tonsure Case). याप्रकरणी आता चार शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. समाधान जुगधर, प्रकाश हसबे, श्रीकांत यादव आणि सत्यवान कोळंबेकर अशी अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांची नावं आहेत (Four Shivsena supporters arrested).

शिवसैनिकांना अटक केल्याबाबत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

गेल्या सोमवारी (23 डिसेंबर)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने, शिवसैनिकांनी हिरामणी तिवारी यांना बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांचं मुडणंही केलं होतं. हिरामणी तिवारी वडाळ्यातील रहिवाशी आहे. हिरामणीने मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट त्यांच्या घराकडे कूच केली. त्यानंतर त्यांना मारहाण करुन त्यांचं मुंडण करत अवहेलना केली.

उद्धव ठाकरे यांनी जामिया विद्यापीठातील मारहाणीची तुलना जालियावाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्याविरोधात हिरामणीने फेसबुकवर पोस्ट लिहित, उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. या पोस्टने चिडलेल्या शिवसैनिकांनी हिरामणी तिवारीला मारहाण करुन, त्याचे केस कापले होते. हिरामणी तिवारी हे बजरंग दल, विश्वहिंदू परिषद यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगतात. दादरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमाला हिरामणी तिवारींनी हजेरी लावली होती.

याबाबत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर नागरिकांनमध्ये दहशत पसरवण्याचा आरोप केला होता. तसेच, त्यांनी वडाळा पोलिसांकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणीही केली होती. याप्रकरणी सोमय्यांनी आंदोलनही केलं. सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वेंकडे हिरामणी तिवारी मुंडण प्रकरणातील 22 शिवसेना कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.