मान्सूनपूर्व पावसाने तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ; मुंबईकरांना दिलासा

| Updated on: Jun 12, 2022 | 10:33 AM

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

मान्सूनपूर्व पावसाने तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ; मुंबईकरांना दिलासा
Follow us on

मुंबई : राज्यात यंदा मान्सूनचे (Monsoon) आगमन उशिरा झाले आहे. मात्र अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या मान्सूनपूर्व पडलेल्या पावसाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला. पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग आला. तसेच या पवासमुळे तलावाच्या पाणीसाठ्यात (Water reserves) देखील वाढ झाली आहे. मुंबईतही (Mumbai) गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी, विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि मोडक सागर या तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मुंबईकरांना दररोज सात तलावाच्या माध्यमातून 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. वर्षाकाठी या तलावातून मुंबईकरांना एकूण 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान मुंबईत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्याने या तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

मुंबईकरांना दिलासा

मुंबईला ज्या सात तलावातून पाणीपुरवठा केला जातो त्यातील विहार आणि तुळशी हे दोनच मोठे तलाव मुंबईत आहेत. तर इतर पाच तलाव हे ठाणे परिसरात आहेत. या तलावाची पाणीसाठवण क्षमता देखील मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे या तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मुंबईकरांचा पाणीप्रश्न तुर्तास सुटणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईकराना सर्वाधिक पाणीपुरवठा भातसा तलावातून होतो. एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे 50 टक्के पाणीपुरवठा हा भातसा धरणातून होतो. गेल्या दोन दिवसांत भातसा तलाव परिसरात 21 मिलिमिटर पाऊस झाला असून, त्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या तलावात एकूण 96844 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

हे सुद्धा वाचा

…तर पाणीकपात

यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अवकाळी पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ देखील झाली आहे. सध्या तलावात 51 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र पाऊस लांबल्यास महापालिकेला पुढील काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन देखील करावे लागणार आहे. अशा स्थितीत मुंबईमध्ये पाणीकपात केली जाऊ शकते. सध्या तलावांची पाणी पातळी वाढल्यामुळे तुर्तास तरी पाणीकपातीचे संकट टळले आहे.