मुंबईकरांसाठी खूशखबर! मोहीम जवळपास फत्ते, लाईफलाईन पुन्हा ड्यूटीवर परत, मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होणार

| Updated on: Nov 20, 2022 | 5:20 PM

कर्नाक पुलाचं पाडकाम पूर्ण झालं असून पुढच्या काही मिनिटांमध्ये सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन पहिली लोकल ट्रेन धावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबईकरांसाठी खूशखबर! मोहीम जवळपास फत्ते, लाईफलाईन पुन्हा ड्यूटीवर परत, मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होणार
Follow us on

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजेपासून तब्बल 27 तासांचा अभूतपूर्व असा ब्लॉक घेण्यात आलाय. ब्रिटिश कालीन धोकादायक झालेल्या कर्निक पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वे विभागाने हा मेगाब्लॉक घेतला होता. गेल्या 15 तासांपासून युद्धपातळीवर न थकता शेकडो रेल्वे कर्मचारी, मजूर, अधिकारी आणि अभियंत्यांचं पूल पाडण्याचं काम सुरु होतं. पुलाच्या पाडकामामुळे अर्थात प्रवाशांची आज गैरसोय झाली. पण प्रवाशांच्या याच गैरसोयीचा विचार करुन मध्य रेल्वे प्रशासनाने ही मोहिम डेडलाईनच्या आधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. कारण पुलाचं पाडकाम पूर्ण झालं असून पुढच्या काही मिनिटांमध्ये सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन पहिली लोकल ट्रेन धावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूला मोठ-मोठ्या क्रेन्स लावून पुलाचा लोखंडी साचा बाजूला काढण्यात आला. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सध्या 80 टक्के काम पूर्ण झालंय. तसेच उर्वरित 20 टक्के काम पुढच्या अर्ध्या तासांमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय.

सध्या पूल पाडल्यानंतर ओव्हरहेड वायर जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या पूल पाडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेचे शेकडो कर्मचारी ट्रॅकवर उतरले. इंजिनिअरची टीम युद्ध पातळीवर ओव्हरहेड वायर्स जोडण्याचे काम करत आहे.

“आम्ही 27 तासांचा मेगाब्लॉक घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम केलंय. मेन लाईनवर 17 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय. वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येईल. हार्बर लाईनची वाहतूक आज रात्री आठ वाजता पूर्वपदावर येईल. त्यानंतर ठरलेल्या वेळेनुसार वाहतूक सुरळीत होईल. ब्लॉक सुरु होण्याआधीच आम्ही योग्य नियोजन केल्याने योग्य वेळेत काम करणं सोपं गेलं”, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी दिली.