किरीट सोमय्यांचा आवाज दडपता येणार नाही, भाजप त्यांच्या पाठिशी : चंद्रकांत पाटील

| Updated on: Sep 19, 2021 | 11:25 PM

भाजपा पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांचा आवाज दडपता येणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिला.

किरीट सोमय्यांचा आवाज दडपता येणार नाही, भाजप त्यांच्या पाठिशी : चंद्रकांत पाटील
chandrakant patil
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी सरकार बळाचा वापर करून भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांचा आवाज दडपू पाहत आहे, पण ही दडपशाही चालणार नाही. भाजपा पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांचा आवाज दडपता येणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिला. (Kirit Somaiya’s voice cannot be suppressed, BJP standing behind him: Chandrakant Patil)

पाटील म्हणाले की, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढत असताना त्यांना कोल्हापूरला जाण्यास रोखण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला. महाविकास आघाडी सरकारने त्यांना रोखण्यासाठी पोलीस पथक पाठवले, त्यांच्यावर दबाव आणला. कोल्हापूरमध्ये प्रवेश करू देणार नाही, रेल्वे स्थानकावरून परत पाठवू, कोल्हापूरच्या सर्किट हाऊसमध्ये स्थानबद्ध करू, असे इशारे किरीट सोमय्या यांना या सरकारने दिले.

राज्यातील लोकशाही संपली का? असा सवाल करून चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची दंडुकेशाही चालणार नाही. या सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही आणि किरीट सोमय्या हे सुद्धा घाबरत नाहीत. भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांनी उघडकीस आणलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे तार्किक शेवटाकडे नेली जातील. महाविकास आघाडीने दडपल्याने हे विषय थांबणार नाहीत.

पाटील म्हणाले की, मुंबईत घातपाती कारवाया करण्याच्या प्रयत्नातील दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून पकडले जाते. महाविकास आघाडीच्या राज्यात दहशतवादी मोकळेपणाने फिरतात आणि किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर मात्र दीडशे पोलिसांचा वेढा घातला जातो, याचा आम्ही निषेध करतो.

‘किरीट सोमय्या आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी?’

“भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी आहेत? त्यांनी कशामुळे कोल्हापुरात यायचं नाही? आता महाराष्ट्रात अधिकृतपणे आणीबाणी घोषित करा. सोशल मीडियावर लिहायचं नाही. ताबोडतोब नोटीस, अटक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं स्वातंत्र्य नाही”, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोष व्यक्त केला. ते ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलत होते. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर स्थानबद्धची जी कारवाई करण्यात आली त्यावर संताप व्यक्त केला.

नेमकं प्रकरण काय?

किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्याला जाण्याचं नियोजन केलं आहे. ते उद्या (20 सप्टेंबर) कोल्हापूरला दाखल होणार आहेत. पण त्याआधीच त्यांना मुंबईत स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसेच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस बजावली आहे. त्यामध्ये त्यांनी सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. पण किरीट सोमय्या हे कोल्हापुरला जाण्यावर ठाम आहेत. सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे सोमय्या उद्या मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यातही जाणार आहेत. त्यावर मुश्रीफ समर्थकांनी तुम्ही येऊनच दाखवा, असा इशारा दिलाय. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्यावर मुंबईत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यावर सोमय्या यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

इतर बातम्या

किरीट सोमय्यांचे चार दिवसांत चार मोठे दौरे, कोणाकोणाचा करणार करेक्ट कार्यक्रम?

आमदार आशुतोष काळे यांना कोरोना, साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद स्वीकारताना झाली होती गर्दी, संसर्ग वाढणार?

(Kirit Somaiya’s voice cannot be suppressed, BJP standing behind him: Chandrakant Patil)