रझा अकादमीवर बंदी घाला, उद्या भाजपच्या कार्यकारिणीत प्रस्ताव मांडणार: चंद्रकांत पाटील

| Updated on: Nov 15, 2021 | 12:22 PM

राज्याच्या काही भागात झालेल्या हिंसाचारात रझा अकादमीचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी आणण्याची मागणीही भाजपने केली आहे.

रझा अकादमीवर बंदी घाला, उद्या भाजपच्या कार्यकारिणीत प्रस्ताव मांडणार: चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Follow us on

मुंबई: राज्याच्या काही भागात झालेल्या हिंसाचारात रझा अकादमीचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी आणण्याची मागणीही भाजपने केली आहे. उद्या भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यात रझा अकादमीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील हिंसाचारावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची आमची मागणी असल्याचंही सांगितलं. उद्या भाजच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. यावेळी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करणारा प्रस्ताव मांडणार आहोत. तसेच रझा अकादमीची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येणार आहे, असं पाटील यांनी सांगितलं. राज्यात 2014 ते 2019मध्ये एकही दंगल झाली नाही. पण यांच्या काळात मुस्लिम विभागात कोव्हिड नियमांमुळे पोलिसांना मारहाण झाली. आता काय सुरू आहे ते बघा, असंही ते म्हणाले.

आता गेंडेही बोलू लागलेत…

एसटीच्या संपावरूनही त्यांनी आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. एअर इंडिया आणि एसटीचा संबंध काय? आम्ही घरकाम करणाऱ्या ताईलाही बोनस म्हणून 5 हजार रुपये देतो. जे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतंय ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळायला हवं. त्यात चुकीचं काय आहे? 40 च्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजूनही सरकारला जाग आलेली नाही. आता तर गेंडेही बोलू लागले. आमचा अपमान होतोय असं गेंडेही म्हणू लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

आमचा धाक आहे हेच सर्टिफिकेट

राज्यात तीन तीन जणांचं सरकार असताना आमचा त्यांना धाक आहे. याचं सर्टिफिकेटच त्यांनी दिलं आहे. राज्यात जे काही होतंय ते आम्हीच करतोय असं सांगितलं जातं. किती हस्यास्पद आहे हे. सुरुवात कोणी केली हे बघा, असा चिमटाही त्यांनी काढला.

विधान परिषद लढणार

भाजप विधानपरिषदेची जागा लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. संजय केणेकर हे भाजपकडून विधानपरिषदेसाठी अर्ज भरत आहेत. गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामुळे बघुया काय होतं ते, असे सूचक संकेतही त्यांनी दिले.

लोकशाहीची ब्युटीच अशी आहे

अभिनेते विक्रम गोखले यांनी स्वातंत्र्याबाबतच्या अभिनेत्री कंगना रणावत यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलं आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मोजकीच प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकशाहीची ब्युटी अशी आहे की, कोणालाही काही बोलण्याचा अधिकार आहे. ते बोलले ते ठिक आहे, असं पाटील म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

राजीनामा देऊन नाराजी कळवली, वेट अँड वॉच नंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय भूकंपाने वर्धा हादरले

प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर, काँग्रेसची घोषणा

Babasaheb Purandare Death | शिवशाहीरांच्या निधनावर मोदींचं ट्विट, गडकरी, राऊत, इतर नेते नेमकं काय म्हणाले?