AC : अबब! मुंबईची निम्मी वीज एसीसाठी वापरली जाते, ‘या’ उच्चभ्रूवस्तीत मध्यरात्रीनंतर वापर वाढला…

| Updated on: Jul 11, 2022 | 9:06 AM

मुंबईला पुरवल्या जाणाऱ्या एकूण विजेपैकी जवळपास अर्धी वीज निव्वळ एसीसाठी वापरली जात आहे.

AC : अबब! मुंबईची निम्मी वीज एसीसाठी वापरली जाते, या उच्चभ्रूवस्तीत मध्यरात्रीनंतर वापर वाढला...
Follow us on

मुंबई : मुंबईला पुरवल्या जाणाऱ्या एकूण विजेपैकी जवळपास अर्धी वीज (Light) निव्वळ एसीसाठी वापरली जात आहे. म्हणजे जवळपास 1500 मेगावॅट वीज एसीसाठी वापरली जात आहे. आधी कॉर्पोरेट ऑफिसेस, मॉल याठिकाणी असणारा एसी आता आता सर्वसामान्यांच्या घरात आला आहे. बैठ्या चाळीतील अनेकांच्या घरातही गारेगार हवेसाठी एसी (AC) वापरला जात आहे. त्यामुळेच मागच्या पाच वर्षांत मुंबईची विजेची मागणी दोन हजार मेगावॅटवरून तब्बल साडेतीन हजार मेगावॅटपर्यंत पोहचली आहे. सध्या पावसाळा असूनही दररोज तीन हजार मेगावॅट एवढ्या मागणीची नोंद होत आहे. या वीजेच्या वापराला एसीच जबाबदार आहे. मुंबई शहरासह उपनगराला अखंडित वीजपुरवठा व्हावा म्हणून स्वतंत्र उच्चदाब वीज वाहिन्या उभ्या केल्या आहेत. तसंच आयलैंडिंग यंत्रणा देखील उभारली आहे.

2016 पर्यंत 2000 ते 2200 मेगावॅटपर्यंत विजेच्या मागणीची नोंद झाली होती. त्यामुळे मुंबई परिसरातील वीज प्रकल्पातून उपलब्ध होणारी वीज आणि उच्चदाब वीज वाहिन्यांमधून येणारी वीज पुरेशी होती. पण गेल्या दहा वर्षात एसीचा वापर झपाट्याने वाढत आहे. मॉल, शॉपिंग सेंटर, कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये सुरुवातीला दिसणारे एसी आता सर्वत्र दिसू लागले आहेत. त्यामुळेच उन्हाळ्यात मुंबईची विजेची कमाल मागणी 3600 मेगावॅटपर्यंत पोहचली होती.

वर्षाला 200 मेगावॅटची वाढ

मुंबईच्या विजेच्या मागणीमध्ये वर्षाला सुमारे 200 मेगावॅटची वाढ होत आहे. त्यामुळे सध्या 3600 मेगावॅट असलेली विजेची कमाल मागणी 2025 पर्यंत 4200 मेगावॅटपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत वाढीव वीज आणण्यासाठी उच्चदाब वीज वाहिन्या उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

विजेचा वापर

  • वातानुकूलित यंत्रणा – ४३ टक्के
  • उद्योग २८ टक्के
  • वाणिज्यिक ग्राहक – १२ टक्के
  • घरगुती ग्राहक १७ टक्के

अंधेरी लोखंडवालामध्ये विजेच्या वापरात वाढ

आतापर्यंत विजेची कमाल मागणी सकाळी 9 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते रात्री 10पर्यंत असायची. त्यानंतर रात्री विजेची मागणी आर्ध्याहून कमी होते. पण अंधेरी लोखंडवाला परिसरातील उच्चभ्रू वस्तीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्यांची संख्या मोठी असून ते बऱ्याचदा शूटिंगचं काम संपवून मध्यरात्री घरी येतात. ते आल्यानंतर एसी चालू करत असल्याने अंधेरी परिसरातील वीज उपकेंद्रातील वीज वापर मध्यरात्री वाढतो.