विमान अपहरणाची अफवा पसरवणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्याला जन्मठेप

| Updated on: Jun 12, 2019 | 12:52 PM

प्रेमात नकार मिळाल्याने विमानाचे अपहरण मुंबईतील व्यापाऱ्याला महागात पडलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनेच्या (NIA) विशेष न्यायालयाने विमान अपहरणाची अफवा पसरवल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

विमान अपहरणाची अफवा पसरवणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्याला जन्मठेप
Follow us on

मुंबई : मुंबईतील व्यापाऱ्याला विमान अपहरणाची अफवा परसणं महागात पडलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनेच्या (NIA) विशेष न्यायालयाने विमान अपहरणाची अफवा पसरवल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बिरजू सल्ला असे मुंबईतील आरोपीचे नाव आहे. त्याचसोबत, पाच कोटी रुपयांच्या दंडही ठोठावला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले असून, विमान अपहरणासंदर्भातील नव्या कायद्यान्वये शिक्षा ठोठावण्यात आल्याचे अशाप्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे.

बिरजू सल्लाने ऑक्टोबर 2017 मध्ये जेट एअरवेजचे विमानातील शौचालयात एक पत्र ठेवलं होतं. “या विमानाचे अपहरण झाले आहे आणि हे विमान थेट पाकव्यापत काश्मीरमध्ये (Pok) उतरवलं जाईल. तसंच जर कोणीही याची माहिती इतर कोणालाही दिली, तर विमानातील प्रवाशी मारले जातील. त्याशिवाय या विमानात एक बॉम्बही लावण्यात आला आहे,” असं या पत्रात बिरजू सल्लाने लिहिलं होतं.

बिरजूच्या या पत्रानंतर विमानात प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. मात्र त्यानंतर ही एक अफवा असल्याचं उघडकीस आलं होत. बिरजूने एकतर्फी प्रेमात नकार मिळाल्याने त्याने विमान अपहरणाचं कृत्य केल्याचं पोलीस चौकशीत सांगितलं होतं.

प्रेमात नकार मिळाल्याने विमानाचे अपहरण

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरजूचे जेट एअरवेजमध्ये काम करणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. त्याने त्या मुलीला प्रपोज केलं. मात्र तिने त्याला नकार दिला. बिरजूला नकार देणारी मुलगी जेट एअरवेजमध्ये काम करत होती. घटनेच्या दिवशी ती मुलगी त्या विमानातच होती. बिरजूला त्या मुलीला धडा शिकवायचा होता. तसेच विमान अपहरणाची अफवा पसरल्याने त्या मुलीची नोकरी सुटेल, असा त्याला विश्वास होता. म्हणूनच त्याने हे कृत्य केलं.

दंडाच्या रकमेतून नुकसान भरपाई

मात्र त्याच्या या कृत्यानंतर बिरजूला अटक करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी न्यायलयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 5 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या 5 कोटी रुपयांमध्ये विमानातील प्रवाशांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील वैमानिक आणि सह वैमानिकांना प्रत्येकी 1 लाख रुपये मिळणार आहेत. विमानातील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याशिवाय प्रवाशांना प्रत्येकी 25 हजारांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.