मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्यांना तात्पुरती टोलमाफी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

| Updated on: Aug 27, 2022 | 2:23 PM

Mumbai Pune Express Highway News : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्यांना ताप्तुरती टोल माफी करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्यांना तात्पुरती टोलमाफी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन (Mumbai Pune Express Highway) प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्यांना ताप्तुरती टोल माफी (Toll Free) करण्यात आली आहे. महामार्गावर सुरु असलेलं काम, गणेशोत्सवानिमित्त होणारी संभाव्य गर्दी या सगळ्याच्या पार्श्वभूमीर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांना तूर्तास टोल आकारु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. आज दिवसभरासाठी ही टोलमाफी असणार आहे. शनिवारी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूकीची कोंडी (Traffic Alert) ही ठरलेलीच असते. त्यात महामार्गावर सुरु असेललं काम पाहता, ही कोंडी अधिकच वाढली आहे. सकाळपासूनच मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे शनिवारी दिवसभरासाठी मुंबई पुणे महामार्गवरुन टोल आकारला जाऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत.

एका दिवसाची टोलमाफी

आज सकाळी अमृतांजन पुलाजवळ अपघात झाला. त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे एक्स्प्रेस हायवेवरुन दुरुस्तीच्या कामासाठी काल 2 तासांचा ब्लॉक घेण्यात आलेला होता. यामुळे मुंबई पुमे महागामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. ही वाहतूक कोंडी टोलवरील धीम्या वाहतुकीमुळे अधिक वाढू शकते. तसं होऊ नये यासाठी मुंबई पुणे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

…म्हणून झाली वाहतूक कोंडी!

कोकणात गणेश चतुर्थीसाठी जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे अनेकांनी कोल्हापूर किंवा पुणे या मार्गावरुनच कोकणात जायला पसंती दिली आहे. शनिवार असल्यानं आणि जोडून सुट्टी आल्यानं अनेक पर्यटकही पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत. या सगळ्याचा परिणाम मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीवर झाल्याचं पाहायला मिळतंय.

विकेंडमुळे मोठ्या संख्येनं वाहनांची संख्या वाढली. मुंबई पुणे एक्स्प्रेसवरील घाट मार्गात, त्याच प्रमाणे काम सुरु असलेल्या भागात वाहनांचा वेग मंदावतो. अशाने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र नेहमीच पाहायला मिळतंय. यावेळीही तेच झाल्याचं दिसून आलंय. अशातच वाहनं बंद पडणं आणि एखादा अपघात झाल्या, ही कोंडी अधिक वाढते. तर दुसरीकडे टोलवरही अनेकदा फास्टॅग काम न करणं, रोख रक्कम देण्यात वेळ वाया जाणं, यामुळेही वाहनांच्या रांगा लागतात. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अखेर एका दिवसाची टोलमाफी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्यांना अल्पसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.