एप्रिल फूल नाही! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर 1 एप्रिलपासून टोलवाढ

| Updated on: Feb 25, 2020 | 12:36 PM

मुंबई-पुणे दृतगती महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी सध्या कारला 230 रुपये टोल भरावा लागतो. मात्र एक एप्रिलपासून 270 रुपये मोजावे लागणार आहेत

एप्रिल फूल नाही! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 1 एप्रिलपासून टोलवाढ
Follow us on

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. येत्या एक एप्रिलपासून टोलच्या दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती केली आहे. (Mumbai-Pune expressway toll increase)

मुंबई-पुणे दृतगती महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी सध्या कारला 230 रुपये टोल भरावा लागतो. मात्र एक एप्रिलपासून 270 रुपये मोजावे लागणार आहेत. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सना टोल वसुलीचे हक्क देण्यात आले आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

टोलचे नवे दर काय?

मिनी बसचा टोल 355 रुपयांवरुन 420 रुपये करण्यात आला आहे. ट्रक आणि अवजड वाहनांसाठी सध्या 493 रुपये टोल आकारला जातो, तो 580 रुपये होणार आहे.

बसचालकांकडून 675 रुपयांऐवजी 797 रुपये आकारले जाणार आहेत. क्रेन किंवा मल्टिअॅक्सल वाहनांकडून आकारला जाणारा 1165 ते 1555 रुपयांचा टोल 1380 ते 1835 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स एमएसआरडीसीला 8 हजार 262 कोटी रुपये देतील. 6500 कोटी एकरकमी दिले जाणार असून उर्वरित रक्कम हप्त्याने दिली जाईल. त्यामोबदल्यात पुढील 15 वर्षात टोल वसूल करण्याचे अधिकार ‘आयआरबी’कडे असतील. ऑगस्ट 2004 मध्ये म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चरला टोलवसुलीचे अधिकार होते.

2017 मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल 18 टक्क्यांनी वाढला होता. दर तीन वर्षांनी एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात 18 टक्क्यांनी वाढ होईल, अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्येच काढली होती.

मुंबई-पुण्याला जोडणारा 93 किमी लांबीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा भारतातील पहिला काँक्रीटयुक्त सहापदरी, हायस्पीड, टोल आकारला जाणारा एक्सप्रेस वे आहे. हा एक्सप्रेस वे कळंबोली (पनवेल जवळ) येथून सुरु होतो आणि देहू रोड (पुण्याजवळ) येथे संपतो. (Mumbai-Pune expressway toll increase)