राज्यात दंगली भडकवण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात आघाडीचाच हात; नितेश राणेंचा गंभीर आरोप

| Updated on: Nov 15, 2021 | 1:50 PM

राज्यात होणारे हल्ले हे सरकारच्या पाठिंब्याने होत आहेत का? राज्यातील दंगली हा रझा अकादमीने घडवून आणलेला सुनियोजित कट आहे.

राज्यात दंगली भडकवण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात आघाडीचाच हात; नितेश राणेंचा गंभीर आरोप
नितेश राणे, भाजप आमदार
Follow us on

मुंबई: राज्यात होणारे हल्ले हे सरकारच्या पाठिंब्याने होत आहेत का? राज्यातील दंगली हा रझा अकादमीने घडवून आणलेला सुनियोजित कट आहे, असं सांगतानाच राज्यात दंगली भडकावण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात महाविकास आघाडीचाच हात आहे, असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. राज्यात दंगली झाल्या. त्याला रझा अकादमीच जबाबदार असल्याचं उघड झालं आहे. तरीही रझा अकादमीच्या एकाही माणसाला अटक होत नाही. सर्व मर्दानगी आमच्यावर का दाखवली जाते? हिंमत असेल तर रझा अकादमीच्या अध्यक्षांना अटक करून दाखवा, असं आव्हानच राणे यांनी महाविकास आघाडीला दिलं आहे. राज्यात एवढी मोठी दंगल होते. हे महाराष्ट्राच्या इंटेलिजन्सचं फेल्युअर नाही का? असा सवाल करतानाच आमचा सरकारवर विश्वास नाही. येणाऱ्या काळात आम्ही केंद्रीय गृहमंत्री आणि एनआयएशी याबाबत चर्चा करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

नांदेडमध्ये मोर्चाचे पोस्टर लागले होते

महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक घाणेरडं राजकारण सुरू आहे. चुकीचं नरेशन सेट केलं जात आहे. राज्याचे गृहमंत्री आणि अन्य मंत्र्यांची विधाने पाहा. हिंदू संघटनांमुळेच मोर्चे निघाला आणि त्यातून दंगल झाल्याचं चित्रं उभं केलं जात आहे. विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि भाजपमुळे दंगल झाल्याचं सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. आता 13 नोव्हेंबरच्या आधी काय घडलं हे सांगायला लागेल. 12 नोव्हेंबरला नांदेडमध्ये मोर्चा निघाला. हा केवळ मोर्चा नव्हता. तो सुनियोजित मोर्चा होता. त्याचे आधीच सगळीकडे पोस्टर लागले होते, असा दावा राणे यांनी केला.

त्रिपुरातील आंदोलनाचा एक तरी फोटो दाखवा

रझा अकादमीनं 12 तारखेला मोर्चा काढला होता. त्रिपुराला मशीद जाळल्याचं कारण देत आंदोलन करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलं. खरंच अशी कुठली घटना त्रिपुरात घडली का? एक तरी फोटो दाखवा. माझं खुलं आव्हान आहे. याबाबत रझा अकादमी आणि महाविकास आघाडीने उत्तर द्यावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.

रझा अकादमी अतिरेकी संघटना

मोर्चा काढण्याच कारणच सत्य नसताना मोर्चा काढला तरी कसा? मुद्दा अस्तित्वातच नसताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्यात आली. राज्यातील मंत्री यावर काहीच बोलत नाहीत. रझा अकादमी ही एक अतिरेकी संघटना आहे. त्यांच्या स्थापनेपासूनच त्यांचे विचार आणि कार्यप्रणालीही कट्टरपंथीय राहिली आहे. कट्टरपंथीयांचा समाजाशी काय संबंध? या संघटनेचं मूळ तालिबानमध्ये आहे. याच रझा अकादमीने ट्रिपल तलाकला विरोध केला होता. याच संघटनेने व्हॅक्सिनलाही विरोध केला होता. तरीही ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यावर कोणी काहीच कसं बोलत नाही? असा सवाल त्यांनी केला.

रझा अकादमीवर कधी बोलणार?

या संघटनेने महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग केला होता. भिवंडीत दोन पोलीस मारले गेले, त्यातही त्यांचा हात होता. याच संघटनेने बाळासाहेब ठाकरेंना सर्वात जास्त विरोध केला होता याची आठवण आहे का? हिंदू संघटनांनी आंदोलन भडकवलं असं म्हणता मग रझा अकादमीने काय केलं ते कोण बोलणार?, असा सवाल करतानाच उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये दंगे कोणी भडकवले याची माहिती संजय राऊतांनी घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

संबंधित बातम्या:

शरद पवारांना शिक्षण खातं अवघड जागेचं दुखणं का वाटलं?, चव्हाणांना का म्हणाले या खात्यातून सुटका करा?; असा किस्सा जो कुणालाच माहीत नाही

Gujarat ATS | पुन्हा गुजरातमध्येच ड्रग्ज, ATS ची मोठी कारवाई, पाकिस्तानातून आलेले 600 कोटीचे ड्रग्ज जप्त, कनेक्शन काय?

ST Strike: तुटेल एवढं ताणू नये; एकाच वाक्यात शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला!