नववर्षाच्या आगमनासाठी मुंबई सज्ज, 40 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जमीन, पाणी आणि आकाशातही नजर

| Updated on: Dec 31, 2019 | 7:55 PM

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर रात्रभर रस्त्यावर असतात. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठ्या बंदोबस्ताची तयारी केली आहे (Security arrangements of Mumbai Police).

नववर्षाच्या आगमनासाठी मुंबई सज्ज, 40 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जमीन, पाणी आणि आकाशातही नजर
Follow us on

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर रात्रभर रस्त्यावर असतात. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठ्या बंदोबस्ताची तयारी केली आहे (Security arrangements of Mumbai Police). यासाठी सुमारे 40 हजार पोलीस रस्त्यावर असणार आहेत. हा बंदोबस्त जमिनीसोबतच समुद्रात आणि आकाशातही असेल (Security arrangements of Mumbai Police).

चालू वर्षांला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला प्रत्येकजण सज्ज असतो. मुंबईत हा जल्लोष काही वेगळाच असतो. 31 डिसेंबरच्या रात्रीपासून नववर्षाच्या स्वागतासाठी लोक एकत्र जमतात. नव वर्षाचं स्वागत जल्लोषात करतात आणि हा जल्लोष अगदी 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत सुरु असतो. यावेळी लाखो मुंबईकर या स्वागताच्या कार्यक्रमात सहभागी होतात. इतकंच नाही, तर इतर राज्यांतूनही लोक मुंबईत येतात. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईत बंदोबस्ताची चोख आखणी करण्यात आली आहे.

संपूर्ण मुंबईच्या बंदोबस्तातील 40 हजार पोलिसांचा कडेकोट पहारा असणार आहे. समुद्रातील पहाऱ्यासाठी बोटीचा वापर केला जाणार आहे. तसेच आकाशातूनही ड्रोनचा वापर करुन देखरेख केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त आणि जनसंपर्क अधिकारी प्रणय अशोक यांनी दिली. मुंबई पोलीस दलात अनेक पोलीस विभाग आहेत. या सर्व विभागांना बंदोबस्ताच्या कामासाठी तैनात केलं जाणार आहे. यात आरसीपी (राईट कंट्रोल पोलीस), क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम), एसवोएस (स्पेशल ऑपरेशन स्कॉड), एसआरपीएफ (स्टेट रिजर्व पोलीस फोर्स), बिडीडीएस (बॉम्ब डिटेक्शन अँड डीस्पोजल स्कॉड) आणि वाहतूक पोलीस यांचा समावेश असेल.

महिलाविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकंही बनवली आहेत. या व्यतिरिक्त 4700 सीसीटीव्ही कॅमेरा देखील सज्ज असतील. महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील विशेष पोलीस पथके देखील तैनात असणार आहेत. यावेळी वाहतूक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असेल. महत्त्वाच्या ठिकाणी लोक जमतात. त्या ठिकाणचे रस्ते एक दिशा मार्ग आणि पार्किंगसाठी बंद करण्यात येणार आहेत. यात रिगल सिनेमा ते गेट वे कडे जाणारा रस्ता, नरिमन पॉईंटकडून गिरगाव चौपाटीकडे येणारा रस्ता, माउंट मेरीकडून बँड स्टँडला जाणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे.

मोठ्या प्रमाणात लोक जमा झाल्याने वाहतूक खोळंबाही होतो. म्हणूनच वाहतूक पोलिसांनी नागरिकांना खासगी गाडी घेऊन बाहेर न पडण्याचं आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग) सोमनाथ घारगे यांनी याविषयी माहिती दिली.

रस्त्यावर लोकांनी दारू पिउन गाडी चालवू नये यासाठी देखील विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे नववर्षाचा आनंद साजरा करताना तळीरामांवर कठोर कारवाई होणार आहे. कोणतंही गैरकृत्य केल्यास नवं वर्षाचा पहिलाच दिवस त्यांना जेलमध्ये काढावा लागेल.