मुंबईत प्‍लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई, आदित्य ठाकरेंचे पालिकेला निर्देश

| Updated on: Mar 01, 2020 | 12:55 PM

महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्‍लास्टिक वापरावर आजपासून कडक कारवाई करण्‍याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईत प्‍लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई, आदित्य ठाकरेंचे पालिकेला निर्देश
Follow us on

मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्‍लास्टिक वापरावर (Action On Plastic Use) आजपासून (1 मार्च) कडक कारवाई करण्‍याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे (Plastic Ban). मुंबईतील नागरिक, व्‍यापारी, फेरीवाले यासह‍ सर्वांनी प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जून 2018 पासून आजपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात (Action On Plastic Use) सुमारे 16 लाख आस्‍थापनांना भेटी देऊन जवळपास 86 हजार किलो प्‍लास्टिक जप्‍त केले आहे. तर, सुमारे 4 कोटी 65 लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्‍यात आला आहे. राज्‍याचे पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी महाराष्‍ट्रात प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर रोखण्‍यासाठी कारवाई तीव्र करण्‍याचे निर्देश दिले आहेत. मे 2020 पर्यंत संपूर्ण महाराष्‍ट्र प्रतिबंधित प्‍लास्टिक मुक्‍त करण्‍याचे लक्ष्‍य निश्चित करण्‍यात आले आहे.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसुचनेनुसार, संपूर्ण महाराष्‍ट्रात प्‍लास्टिकवर बंदी घातली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने आज मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट येथे दुकानांमध्ये जाऊन प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होतोय का याची पाहणी केली. ज्यामध्ये दुकानदार हे कापडाच्या आणि कागदाच्या पिशव्या वापरताना दिसले.

1 मार्चपासून पुन्हा प्लास्टिक बंदी

महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसुचनेनुसार संपूर्ण महाराष्‍ट्रात पुन्हा प्‍लास्टिक बंदी करण्यात आली आहे. या अंतर्गत प्‍लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या प्‍लास्टिकपासून बनवण्यात येणार्‍या आणि एकदाच वापरल्या जाणार्‍या टाकाऊ वस्तू यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधित प्‍लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये, दुसर्‍या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये, तिसर्‍या गुन्ह्यासाठी 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेची कतरतूद करण्यात आली आहे.

महानगरपालिका क्षेत्रात, प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी जून 2018 मध्ये ब्ल्यू स्क्वॉडची स्थापना करण्यात आली. पालिकेच्या बाजार, अनुज्ञापन आणि दुकाने व आस्थापना खात्यातील एकूण 310 निरी‍क्षकांची नेमणूक करण्‍यात आली आहे.

महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 16 लाख 324 आस्थापनांना भेटी दिल्या असून 85 हजार 840 किलोग्रॅम प्रतिबंधित प्‍लास्टिक जप्त करण्‍यात आले आहे. 668 आस्थापनांना तपासणी अहवाल दिले आहेत. तर, 4 कोटी 64 लाख 30 हजार रुपये इतका दंड वसूल करण्‍यात आला आहे.

दुकाने आणि आस्‍थापना खात्‍यातर्फे व्‍यापारी संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करुन, प्रतिबंधित प्‍लास्टिक न वापरण्‍याबाबत जनजागृती, नाट्यगृहामध्‍ये प्रयोगाच्‍या सुरुवातीला तसेच मध्‍यंतरात प्रतिबंधित प्‍लास्टिक न वापरण्‍याबाबत प्रेक्षकांना जाहीर सुचना करण्‍याबाबत नाट्यगृह संचालक मंडळास कळविण्‍यात येणार आहे.

प्रतिबंधित प्‍लास्टिक कारवाईत ज्‍येष्‍ठ नागरिक आणि सेवानिवृत्त नागरिकांचा सहभाग घेऊन मोहिमेची व्‍याप्‍ती वाढवण्‍यात येणार आहे. विभाग स्‍तरावर प्रतिबंधित प्‍लास्टिक पथक तयार करुन ज्‍यामध्‍ये बाजार, अनुज्ञापन, दुकाने आणि आस्‍थापना, आरोग्‍य, परिरक्षण या खात्‍यांतील पथकांचा समन्‍वय अधिकारी नेमण्‍यात येईल. मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्‍या वाहनांवर प्रति‍बंधित (Action On Plastic Use) प्‍लास्टिकबाबत जनजागृती फलक लावण्‍यात येतील.