उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक रद्द, कारण गुलदस्त्यात; पुढची बैठक कधी?

| Updated on: Dec 05, 2022 | 12:16 PM

यापूर्वी प्रबोधन डॉटकॉम या संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. एखाद्या जाहीर कार्यक्रमात एकत्र येण्याची या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच वेळ होती.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक रद्द, कारण गुलदस्त्यात; पुढची बैठक कधी?
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात होणारी आजची बहूचर्चित बैठक आज रद्द झाली आहे. ही बैठक रद्द का झाली याचं कारण अद्याप कळलेलं नाही. तसेच पुढील बैठक कधी होणार? होणार की नाही? याचीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, अचानकपणे या दोन्ही नेत्यांमधील बैठक रद्द झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज दुपारी 12 वाजता मुंबईतील महालक्ष्मी फोर सिझन हॉटेलमध्ये बैठक होणार होती. या बैठकीत शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात होतं.

हे सुद्धा वाचा

त्यानिमित्ताने राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द होण्याचं कारण समजू न शकल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

यापूर्वी प्रबोधन डॉटकॉम या संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. एखाद्या जाहीर कार्यक्रमात एकत्र येण्याची या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीचे संकेत दिले होते.

यापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनीही शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा प्रकट केलेली होती. त्यातच उद्धव ठाकरे यांनीही युतीचे संकेत दिल्याने दोन शक्ती एकत्र येण्याची शक्यता बळावली होती.

दोन दिवसांपूर्वी संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रकाश आंबेडकरांसोबतच्या युतीबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा आम्ही येत्या दोनचार दिवसात भेटणार असल्याचं सांगितलं होतं.

त्यानंतर आज या दोन्ही नेत्यांची भेटही ठरली होती. मात्र, अचानक भेट रद्द झाली. आता ही भेट कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून चाललं आहे. दरम्यान, या पूर्वी शिवसेनेने रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासोबत युती केली होती.

शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली होती. तर त्या आधी दलित पँथरचे नेते, प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांनीही शिवसेनेसोबत युती केली होती. तर 70च्या दशकात रिपाइंचे दिवंगत नेते रा. सू. गवई यांनीही शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवली होती.

मात्र, यावेळी आंबेडकर घराण्यातील व्यक्तीनेच उद्धव ठाकरे यांना युतीची साद घातल्याने या दोन्ही नेत्यांच्या एकत्रित येण्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.