Nagpur NMC : नागपूर शहरात आजपासून अतिक्रमणावर हातोडा, फुटपाथ घेणार मोकळा श्वास, मनपा आयुक्तांची गांभीर्यानं दखल

| Updated on: Jun 28, 2022 | 9:51 AM

पोलीस प्रशासन आणि उपद्रव शोधपथकाच्या जवानांच्या सहकार्याने ही अतिक्रमण कारवाई केली जाईल. फुटपाथ व रस्ते मोकळे करण्यासाठी ही विशेष कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात येणारे हातठेले व अन्य सर्व प्रकारचे साहित्य मनपा जप्त करणार आहे.

Nagpur NMC : नागपूर शहरात आजपासून अतिक्रमणावर हातोडा, फुटपाथ घेणार मोकळा श्वास, मनपा आयुक्तांची गांभीर्यानं दखल
नागपूर शहरात आजपासून अतिक्रमणावर हातोडा
Follow us on

नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय. या अतिक्रमणाविरुद्ध महापालिकेने कठोर पवित्रा घेतलाय. आजपासून संपूर्ण शहरात मनपाद्वारे धडक कारवाई केली जाणार आहे. फुटपाथ आता मोकळा श्वास घेणार आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांची विशेष बैठक बोलावून यासंदर्भात आदेश दिलेत. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या विशेष बैठकीत राधाकृष्णन बी. (Radhakrishnan B) यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी (Ram Joshi), उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापक संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रकाश वराडे (Prakash Varade), विजय हुमने, गणेश राठोड, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य आदी उपस्थित होते. शहरातील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, वाहतुकीची समस्या, पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. अस्वच्छता यासंदर्भात वारंवार प्राप्त होणार्‍या तक्रारींवर मनपा आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली.

जप्त केलेले साहित्य महिनाभर दिलं जाणार नाही

शहरातील फुटपाथ, रस्ते येथे असणारे हातठेले, दुकाने, दुकानांचे साहित्य व अन्य सर्व प्रकारच्या अतिक्रमणावर सक्तीने कारवाई आजपासून केली जाणार आहे. पोलीस प्रशासन आणि उपद्रव शोधपथकाच्या जवानांच्या सहकार्याने ही अतिक्रमण कारवाई केली जाईल. फुटपाथ व रस्ते मोकळे करण्यासाठी ही विशेष कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात येणारे हातठेले व अन्य सर्व प्रकारचे साहित्य मनपा जप्त करणार आहे. जप्त केलेले साहित्य महिनाभर परत दिले जाणार नाही.

1 जुलैपासून प्लास्टिक कारवाई

केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर एक जुलैपासून संपूर्ण नागपूर शहरात कारवाई केली जाणार आहे. सर्व झोन स्तरवर उपद्रव शोधपथकाच्या जवानांद्वारे सक्तीने कारवाई करण्याचेही आयुक्त नी बैठकीत निर्देश दिले. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं नागपूर शहरात प्रतिबंधीत प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा