Nagpur Accident : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, नागपुरातील युवकाचा चिखली डोहात बुडून मृत्यू

पेंच नदीच्या पात्रातील हा डोह धोकादायक आहे. डोहात आंघोळ करण्यासाठी किंवा पोहण्यासाठी कुणी उतरू नये, असे सूचना फलक लावले आहेत. मात्र, हौशी तरुण त्याकडे दुर्लक्ष करून पोहायला उतरतात. या डोहात गेल्या आठ-दहा वर्षात 32 पेक्षा अधिक लोकांचा बुडून मृत्यू झालेत.

Nagpur Accident : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, नागपुरातील युवकाचा चिखली डोहात बुडून मृत्यू
नागपुरातील युवकाचा चिखली डोहात बुडून मृत्यू
सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 26, 2022 | 4:05 PM

नागपूर : पारशिवनी (Parshivani) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेंच नदीचे पात्र आहे. घोगरा देवस्थान परिसरात नागपूर येथील तिरपुडे महाविद्यालयाचे सहा मित्र फिरायला आले होते. यातील एका युवकाला चिखली डोहातील पाणी पाहून पोहण्याचा मोह झाला. पोहण्यासाठी डोहात उडी मारली. पाणी खोल असल्यानं त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या डोहात आतापर्यंत 32 जणांचे बळी गेले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बुटीबोरी येथील शशांक मनोज तिवारी (वय 23) असे मृताचे नाव आहे. शशांक नागपूर शहरातील तिरपुडे महाविद्यालयात (Tirpude College) एमबीएच्या अंतिम वर्षाला शिकत होता. शशांक हा त्याच्या कॉलेजमधील बीसीसीएच्या पाच विद्यार्थ्यांसोबत पारशिवनी तालुक्यातील घोगरा देवस्थान परिसरात (Ghogra Devasthan Complex) फिरायला गेला होता. सर्व जण नदीकाठच्या झाडाखाली बसले. डोहातील पाणी पाहून पोहायचे आहे असे म्हणत शशांकने पाण्यात उडी मारली. तो डोहात बुडत असल्याचे पाहून मित्रांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी मृतदेह पाण्याबाहेर काढला.

सूचना फलकाकडं दुर्लक्ष

पेंच नदीच्या पात्रातील हा डोह धोकादायक आहे. डोहात आंघोळ करण्यासाठी किंवा पोहण्यासाठी कुणी उतरू नये, असे सूचना फलक लावले आहेत. मात्र, हौशी तरुण त्याकडे दुर्लक्ष करून पोहायला उतरतात. या डोहात गेल्या आठ-दहा वर्षात 32 पेक्षा अधिक लोकांचा बुडून मृत्यू झालेत. शशांक तिवारी हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा मृतदेह देमा खंडाते (67, रा. पारशिवनी) यांनी पाण्यात शोधून बाहेर काढला. त्यांनी आतापर्यंत सुमारे 22 मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत.

अंबाळा तीर्थस्थानी बुडून युवकाचा मृत्यू

नागपुरातील तांडापेठ येथील मयूर अशोक कांबळे (वय 22) हा आपल्या नातेवाईकांसह आजीच्या अस्थी विसर्जनासाठी रामटेक येथील अंबाळा तीर्थस्थानी आला होता. विसर्जन करताना अंबाळा तलावाच्या काठावरून मयूरचा पाय घसरला. पोहणे येत नसल्याने तो तलावात गटांगळ्या खाऊ लागला. एकाने त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली. पण, त्याला वाचविण्यात यश आले नाही. तरुण तलावात बुडाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. दोन तास शोधल्यानंतर मयूरचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनासाठी मयूरचा मृतदेह रामटेक उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला. मयूरचे वडील हयात नसून तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्यामागे एक बहीण व आई आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें