जाता जाता जातंयच की!, टाटा एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?

| Updated on: Oct 30, 2022 | 10:41 AM

आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती आहे.

जाता जाता जातंयच की!, टाटा एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?
Follow us on

मुंबई : सध्या अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती आहे. नुकतंच काही दिवसांआधी टाटा एअरबस (Tata Airbus Project) हा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेला. त्यानंतर आता आणखी एक प्रकल्प नागपुरातून राज्याबाहेर जातोय. सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्प (Saffron Group Project) आता हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या मिहानमधील हा प्रकल्प आहे.

फ्रेंच कंपनी सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प आहे. सॅफ्रन कंपनी मिहानमध्ये 1 हजार 185 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे.

सॅफ्रन ग्रुपचे सीईओ संबंधित अधिकाऱ्यांना भेटले. परंतू जागा न मिळाल्याने हा प्रकल्प हैदराबादला जात आहे. सॅफ्रन ग्रुपचे सीईओ केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटले आणि जागे अभावी हा प्रकल्प हैदराबादला जात असल्याचं सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विदर्भात आधीच रोजगाराची वानवा आहे. त्यातच तरूणांच्या हाताला काम देणारा आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने स्थानिकांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे.

टाटा एअरबस हा प्रकल्प राज्याबाहेर गेलाय. नागपुरात होणारा हा प्रकल्प आता गुजरातला हलवण्यात आला आहे.या प्रकल्पाचं आज भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे.

आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या दिशेने भारताने मोठी झेप घेतली आहे. गुजरात राज्यातील वडोदरा इथे टाटा आणि एअसबस या दोघांच्या संयुक्त उपक्रमातून C-295 हे मोठी वाहतूक करणारी विमानं तयार केली जाणार आहेत.