एकीकडे आदिवासी महिला राष्ट्रपती होतेय; तर दुसरीकडे नंदुरबारमधील मुली शिक्षकाविनाच शाळेत जात आहेत…

| Updated on: Jul 25, 2022 | 10:01 PM

गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक येतील आणि आपल्याला शिकवतील या आशेवर आमचे शैक्षणिक आयुष्यच वाया गेल्याचे येथील विद्यार्थिनी सांगतात. तर दुसरीकडे सध्या वसतिगृहातच शाळा सुरु असल्याने कमालीच्या अडचणींचा सामना विद्यार्थिनी करावा लागत आहे.

एकीकडे आदिवासी महिला राष्ट्रपती होतेय; तर दुसरीकडे नंदुरबारमधील मुली शिक्षकाविनाच शाळेत जात आहेत...
Follow us on

नंदुरबारः अभ्यास न करता पास व्हायचं मग चिंता नको, आपल्या मुलीला नंदूरबार जिल्हा परिषदेच्या (Nandurbar ZP Shool) धडगाव तालुक्यातील सुरवाणीतील (Surwani) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील (Kasturba Gandhi Balika Vidyalaya) दाखल करा आणि सहावीपासून काही न शिकवताच दहावीपर्यंत पास व्हा. असाच शिरस्ता येथील शाळेना चालवला आहे. एकीकडे देशाच्या राष्ट्रपती पदी आदिवासी महिला विराजमान होत आहे तर दुसरीकडे मात्र आदिवासी विद्यार्थिनी शिक्षणासाठी तडफडत आहेत. ही अवस्था आहे नंदुरबार जिल्ह्यातील.

नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगावसारख्या अतिदुर्गम तालुक्यातील सुरवाणी गावातील जिल्हा परिषदेच्या कस्तुरबा गांधी विद्यालयाची अवस्था म्हणजे जनावरांच्या गोठ्यासारखी झाली आहे. सध्या वसतिगृहाच्या इमारतीत सुरु असलेल्या शाळेच्या वास्तूत तब्बल तीन योजनांच्या जवळपास अडिचशे विद्यार्थिनी शिक्षणासह वास्तव्य करतात.

सहावी ते दहावीः तीनच शिक्षक

सहावी ते दहावीपर्यंत मुलींच्या वर्गाला या ठिकाणी तीन योजना मिळून अवघे तीनच शिक्षक आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून विद्यार्थिनींना या ठिकाणी गणित, विज्ञान, भुगोल असे सहाहून अधिक विषय शिकवले गेले नसल्याचा धक्कादायक खुलासा खुद्द विद्यार्थीनीनी केला आहे. तरीही या विद्यार्थिनी आता दहावीत गेल्या आहेत. शाळा सुरू होवून दोन महिने लोटले तरी अनेक विषयांचे पहिले पानही उघडले गेलेले नाही तरीही ना यांच्याकडे शासन लक्ष देत ना लोकप्रतिनिधी.

 

वसतिगृहातच शाळाः खोल्या म्हणजे कोंडवाडा

गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक येतील आणि आपल्याला शिकवतील या आशेवर आमचे शैक्षणिक आयुष्यच वाया गेल्याचे येथील विद्यार्थिनी सांगतात. तर दुसरीकडे सध्या वसतिगृहातच शाळा सुरु असल्याने कमालीच्या अडचणींचा सामना विद्यार्थिनी करावा लागत आहे. वसतिगृहात तीन शिक्षक सोडले तर कर्मचारी नाहीत. सकाळी उठून आपल्या राहत्या खोल्यांसह सर्वच ठिकाणची साफ सफाई, करायची मग वेळ मिळाला तर अभ्यास. असा येथील विद्यार्थिनींचा दिनक्रम.

एका खोलीत 20 विद्यार्थिनी

दहा बाय दहाच्या खोलीत जिथे जेमतेम सहा सात विद्यार्थिनी राहू शकतात मात्र आता येथील एका खोलीत आज 18 ते 20 विद्यार्थिनी कोंडवाड्यासारख्या राहत आहेत. खोल्या आहेत, मात्र वीज नाही, वीज असेल तर पंखा नाही अशी येथील अवस्था.

निकृष्ठ दर्जाचे बांधकाम

या वसतिगृहाच्या बाजूला गेल्या तीन वर्षांपासून कस्तुरबा गांधी विद्यालयाची प्रशस्त इमारत उभी आहे खरी, मात्र निकृष्ठ दर्जाचे बांधकाम आणि त्याच्या भग्नावस्थेमुळे ही इमारत ताब्यात घेऊन इथे मुलींचा जीव धोक्यात घालून शाळा कोण चालवणार हा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता या इमारतींविषयी ठेकेदाराने दबाव आणुन ताब्यात दिली तेव्हा गटशिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, समग्र शिक्षण अभियानाचे अभियंते काय करत होते असा सवाल आता पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे.

शाळेत एकमेव महिला शिक्षिका

शाळेत एकमेव महिला शिक्षिका असलेल्या अधीक्षिकांकडे, मुख्याध्यापिकेसह तब्बल तीन चार्ज दिले आहेत.याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करुनही काही उपयोग झाला नाही. या ठिकाणी दस्तुरखुद्द जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतींनी भेट दिल्यानंतर या ठिकाणच्या दुरावस्था पाहून शासन जर शिक्षक, कर्मचारी आणि सुविधाच देत नसेल तर अशा शाळांबद करण्याची मागणीच त्यांनी केली असल्याची समाजकल्याण सभापती रतन पाडवी यांनी सांगितले.