Nashik Loksabha : नाशिकमध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा लाभ होण्याची शक्यता

| Updated on: Apr 08, 2024 | 9:49 PM

नाशिक लोकसभेत महायुतीकडून अजून उमेदवार घोषित झालेला नाही. गोडसे आणि भुजबळांऐवजी महायुतीच्या उमेदवारीसाठी दोन नवी नावं चर्चेत आली आहेत. नाशिक लोकसभेत तिघांच्या भांडणात चौथ्याचाच लाभ होण्याची चिन्ह दिसत आहेत.

Nashik Loksabha : नाशिकमध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा लाभ होण्याची शक्यता
Follow us on

नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि भाजपकडून दिनकर पाटलांचं नाव चर्चेत होतं. दोघांच्या चर्चांना ब्रेक देत छगन भुजबळांचं नाव पुढे आलं. भुजबळांना महायुतीतूनच विरोध सुरु झाल्यानंतर आता भुजबळांऐवजी शिंदेंच्या शिवसेनेचे अजय बोरस्ते आणि भाजपकडून राहुल ढिकलेंचं नाव पुढे आलं आहे. नाशिकची जागा युतीत परंपरेप्रमाणे शिवसेनेकडे तर आघाडीत राष्ट्रवादीकडे राहिली आहे.
पण यंदा शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारीची शक्यता धूसर झाली आहे, तर मविआत ठाकरेंनी राजाभाऊ वाजेंना तिकीट दिलं आहे.

हेमंत गोडसेंचं नाव पुढे आल्यावर स्थानिक भाजपनं तर भुजबळांची चर्चा सुरु झाल्यानंतर शिदेंच्या शिवसेनेनं उमेदवारीला विरोध केला. नाशिकच्या पुरोहित संघानंही देवाधिकांवर टिकेचा आरोप करत अप्रत्यक्षपणे भुजबळांच्या नावाला विरोध दर्शवला.  ज्याप्रमाणे हिंगोली आणि यवतमाळमध्ये फेरचाचपणी करुन उमेदवार बदलले, त्याचप्रमाणे भाजपनं नाशकात पुन्हा चाचपणी केल्याचं बोललं जातंय. नाशिक लोकसभा समन्वयक म्हणून भाजपनं राहुल ढिकले आणि शिंदेंच्या शिवसेनेनं अजय बोरस्तेंची नियुक्ती केली होती. पण उमेदवारीवरुनच गोंधळ पाहता., याच दोन्ही नावांचा आता उमेदवारीसाठी विचार सुरु झाला आहे.

अजय बोरस्ते आधी भाजपात होते, नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर 22 नगरसेवकांसोबत शिंदेंच्या शिवसेनेत ते गेले. पूर्वाश्रमीचे भाजप नेते असल्यानं बोरस्तेंना स्थानिक भाजपकडून पाठिंब्याची आशा आहे.

दुसरीकडे राहुल ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभेचे भाजपचे आमदार आहेत. चांगला जनसंपर्क आणि युवा नेतृत्व म्हणून ओळख आहे. संघ परिवार आणि भाजप देखील त्यांच्या उमेदवारीसा अनुकूल दिसते आहे. त्यामुळे आता कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांनी निवडणक लढवली आणि जिंकली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही गोडसे यांनी या जागेवरून निवडणूक लढवली होती आणि ते खासदार झाले होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर, देवळाली, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

नाशिक मतदारसंघात २०२९ लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी 563599 मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांना 271395 मते मिळाली होती.