शिवारतुंबव्या पावसाचे नाशिकमध्ये थैमान; गोडबार छाटणीपूर्वीच द्राक्षबागांवर नांगर, पिकांचा चिखल अन् शेताचे तळे!

| Updated on: Oct 09, 2021 | 12:51 PM

शिवारतुंबव्या पावसाचे नाशिक जिल्ह्यात प्रचंड थैमान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने गोडबार छाटणीपूर्वीच द्राक्षबागांवर नांगर फिरवला असून, शेतात तळे साचल्याने कांद्यासह साऱ्याच पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे.

शिवारतुंबव्या पावसाचे नाशिकमध्ये थैमान; गोडबार छाटणीपूर्वीच द्राक्षबागांवर नांगर, पिकांचा चिखल अन् शेताचे तळे!
नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून, द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Follow us on

नाशिकः शिवारतुंबव्या पावसाचे नाशिक जिल्ह्यात प्रचंड थैमान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने गोडबार छाटणीपूर्वीच द्राक्षबागांवर नांगर फिरवला असून, शेतात तळे साचल्याने कांद्यासह साऱ्याच पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे.

नाशिक जिल्ह्याकडे सुरुवातीला पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबरच्या एक तारखेपासून सुरू केलेला कहर अजून थांबवला नाही. गेल्या दोन दिवसांत पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. लासलगाव, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यात त्याने कहर केला आहे. शेताशेतांमध्ये गुडघ्या इतके पाणी साचले आहे. दिंडोरी तालुक्यातल्या वरखेडा, मातेरेवाडी, जोपुळ, लोखंडेवाडी, पालखेड, दिंडोरी, वलखेड, कोराटे, लखमापूर, जानोरी, खेडगाव, मोहाडी गावांत आडव्यातिडव्या पावसाने थैमान घातले आहे. लासलगावमध्येही जोरदार पाऊस झाला. पिंपळगाव नजीक, टाकळी विंचूर, कोटमगाव, ब्राह्मणगाव, विंचूर, थेटाळे, खडकमाळेगाव भागातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी द्राक्षबागा, कांदा पीक, सोयाबीन, भुईमूग, मका पिकाचे नुकसान झाले आहे. गंगापूर धरण समूह अगोदरच ओसांडून वाहत आहे. या पावसाने पुन्हा एकदा गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सरसकट पंचनाम्याची मागणी

येवला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मका पीक घेतले. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. मका पिकात गुडघ्या इतके पाणी साचले. पीकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे याची तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. येवल्यातल्या विजय जेजुरकर यांनी मका लागवड केली होती, तर रामनाथ देशमुख यांनी तीन एकरवर कांद्याची लागवड केली होती. त्याला जवळपास 60 ते 70 हजार रुपये खर्च आला. मात्र, अतिवृष्टीमुळे कांद्याच्या वाफ्यांमध्ये पाणी साचले. पीक पूर्णपणे खराब झाले असून शासनाने सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

भयंकर नुकसान

जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात नाशिककडे पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये विनाशक हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल झाले आहे. पावसामुळे झालेला हाहाकार पाहून कुणाचेही काळीज पिळवटून निघेल इतके नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पीके तर आडवी झालीच आहेत, सोबतच 7 हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून, १०४ घरांची पडझड झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक पंचनाम्यात उघड झाले आहे. या विनाशकारी पावसाचा तब्बल 152 गावांमधील 69 हजार 269 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसाने फळबागा, मका, बाजरी, कापूर, सोयाबीन, भुईमुगाचे अतोनात नुकसान झाले आहे.

इतर बातम्याः

नको, नको म्हणतानाही बहाद्दराने पुरात घातली गाडी; नाशिकमधली चित्तथरारक घटना!

नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणारच; नोव्हेंबरच्या तारखांची चाचपणी

कोरोना रुग्णांमुळे पांगरीची शाळा बंद; सिन्नर, निफाड, येवल्यालात कडक निर्बंध लावण्याचा इशारा