मालेगावात हॉटेलमध्ये चहा पिणाऱ्यांवर टोळीचा हल्ला, गोळीबार आणि चाकू हल्ल्याने शहरात दहशत

| Updated on: Jan 15, 2021 | 1:47 AM

जिल्ह्यातील मालेगावमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय. हॉटेलमध्ये चहा पीत असलेल्या 4-5 जणांवर दुचाकीवर आलेल्या 14-15 जणांच्या टोळीने अचानक हल्ला केला.

मालेगावात हॉटेलमध्ये चहा पिणाऱ्यांवर टोळीचा हल्ला, गोळीबार आणि चाकू हल्ल्याने शहरात दहशत
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नाशिक : जिल्ह्यातील मालेगावमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय. गुरुवारी (14 जानेवारी) हॉटेलमध्ये चहा पीत असलेल्या 4-5 जणांवर दुचाकीवर आलेल्या 14-15 जणांच्या टोळीने अचानक हल्ला केला. या टोळीने गोळीबार करत चाकू हल्ला केला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. इब्राहिम खान आणि अबरार शेख अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले (Open Firing in Taj Hotel Malegaon by Gang).

टोळीने केलेला हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या हल्ल्याच्या घटनेने शहरात प्रचंड भीतीचं वातावरण आहे. याआधीही मालेगावात गोळीबाराच्या आणि अशा हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमकं काय घडलं?

अब्राहीम खान हा आपल्या मित्रांसह ताज हॉटेलवर चहा पित बसला होता. त्यावेळी अचानक दुचाकीवर आलेल्या 14-15 जणांच्या टोळक्याने गोळीबार करत चाकू हल्ला केला. हल्लेखोरांनी या हॉटेलमध्ये अक्षरशः हैदोस घातला. गोळीबारासोबत चाकू हल्ला आणि लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. नंतर हल्लेखोरांची ही टोळी फरार झाली.

स्थानिक रहिवाशांनी हल्ल्यानंतर जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल केले. यापैकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरु केला आहे. तसेच या हल्ल्यातील संशयितांची माहिती शहरातील विविध पोलीस स्टेशनलाही देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं.

मालेगावमध्ये गुन्हेगारांची मुजोरी, हल्ल्यांचं सत्र

मालेगावमध्ये मागील काही काळात अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांनी डोकं वर काढल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित झालाय. शहरात टोळीयुद्धही सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस यावर कसं नियंत्रण मिळवणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

हेही वाचा :

कुठे आंदोलनात तलवारीचा धाक तर कुठे गोळीबार? महाराष्ट्रात चाललंय काय?

मालेगावातून आणखी एका बांग्लादेशी नागरिकाला अटक, मदत करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल

Open Firing in Taj Hotel Malegaon by Gang