असंही एक गाव जिथं सर्वधर्मीय महिला धरतात रोजा, लेकरांना का दिलं जाते फकीर बाबाचं नाव?

| Updated on: Apr 19, 2023 | 5:07 PM

सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या महिन्यात मुस्लीम समाजाबरोबर हिंदू महिलाही रोजे धरतात. त्यामुळं सध्या हे गाव चर्चेत आलं.

असंही एक गाव जिथं सर्वधर्मीय महिला धरतात रोजा, लेकरांना का दिलं जाते फकीर बाबाचं नाव?
Follow us on

नांदेड : देशातल्या काही गावांत हिंदू-मुस्लीम वाद होत असला तरी बहुतेक ठिकाणी दोन्ही धर्मीय एकमेकांना सहकार्य करतात. हिंदूंचे सण मुस्लीम समाजाचे लोकं पाळतात. तर मुस्लिमांचे सण हिंदू समाजाचे लोकं पाळतात. असं एक छोटसं गाव नांदेड जिल्ह्यात आहे. या गावातील लोकसंख्या फारशी नसली तरी दोन्ही धर्मीय लोकं गुण्यागोविंदानं नांदतात. विशेष म्हणजे सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या महिन्यात मुस्लीम समाजाबरोबर हिंदू महिलाही रोजे धरतात. त्यामुळं सध्या हे गाव चर्चेत आलं.

रोजे पाळण्याची परंपरा

रमजानच्या पवित्र महिन्यात इस्लाम धर्मात रोजे पाळले जातात. मात्र नांदेडमधील एका गावात हिंदु महिलादेखील रमझान महिन्यात रोजा पाळतात. अनेक वर्षांपासून या गावात रमझान महिन्यात रोजे पाळण्याची परंपरा जपली जाते.

हे सुद्धा वाचा

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिरड गावात हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या फकीर बाबाचा बाराशे वर्षापूर्वीचा दर्गा आहे. फकीरबाबा नवसाला पावणारा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथे नवस केल्याने मुलं बाळ होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

फकीर बाबांवर लोकांची श्रद्धा

फकीर बाबाच्या नवसाने मुलं झाल्यास त्याच नाव देखील फकीर बाबा ठेवले जाते. नंतर बारसे करताना नाव बदलतात. याच फकीर बाबांवरील श्रद्धा म्हणून रमजानमध्ये हिंदू महिला रोजाचा उपवास धरतात. कोणी तीन, कोणी पाच तर अनेक महिला महिनाभर उपवास धरतात. शेकडो वर्षे जुनी असलेली ही प्रथा अजूनही या गावात जपली जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

शिरडमध्ये हिंदू समाजाच्या काही महिला रमझानमध्ये रोजे धरतात. सकाळी मुस्लीम समाजाप्रमाणे सर्व विधी करून कामाला जातात. होळी, दिवाळी, सप्ताह सर्व धर्मीय एकत्र येऊन साजरे करतात.

शिरडमध्ये सुमारे ५० महिलांचे रोजे

रंजना सुनील चवरे म्हणाल्या, मी दहा वर्षांपासून रोजा पकडते. सकाळी पाचपूर्व स्वयंपाक, जेवण करून शेतात जाते. शेतात दिवसभर काम करून संध्याकाळी पुन्हा घरी स्वयंपाक करते. संध्याकाळी रोजा सोडते. शिरडमध्ये ४० ते ५० महिला असे रोजे धरतात.

गंगाबाई गाडे म्हणाल्या, गेल्या वीस वर्षांपासून मी रोजा धरते. गावकरी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. विशेष म्हणजे फकीरबाबा यांना मानणारे लोकं या गावात आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील प्रेमामुळे गावात एकोपा आहे.