Kolhapur News | गोकुळच्या सभेत तुफान राडा, सतेज पाटील गट आणि महाडिक गट आमनेसामने, नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 15, 2023 | 9:34 PM

कोल्हापुरातल्या गोकूळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गोंधळ झाला. सतेज पाटील आणि महाडिकांचे समर्थक आमनेसामने आले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

Kolhapur News | गोकुळच्या सभेत तुफान राडा, सतेज पाटील गट आणि महाडिक गट आमनेसामने, नेमकं काय घडलं?
Follow us on

कोल्हापूर | 15 सप्टेंबर 2023 : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या सभेत नेहमीप्रमाणे तुफान राडा झाला. या सभेत कुणी बॅरिकेट तोडण्याचा प्रयत्न केला, कुणी बॅरिकेटवरुन उड्या मारुन सभेत प्रवेश केला, तर कुणी पोलिसांची नजर चुकवून दुसऱ्याच बाजूनं सभेत एन्ट्री केली. गोकुळ दूध संघाच्या 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे गोंधळ झाला. काँग्रेस आमदार सतेज पाटल यांचे समर्थक सभासद आधीच सभास्थळी पोहोचले होते. पण महाडिक गटाचे समर्थक असलेले सभासद सभास्थळाच्या बाहेर होते.

सभासदांना हातातले ठराव बघूनच आत सोडलं जात होतं. सतेज पाटील समर्थक ठरावधारक आधीच सभास्थळी पोहोचले होते. मात्र सतेज पाटलांनी आजच्या सभेत बोगस ठरावधारक घुसवल्याचा आरोप महाडिक गटानं केला. महाडिक समर्थक गेटच्या बाहेर असतानाच भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक तिथं पोहोचल्या. त्यांनीही मग सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. बोगस ठरावधारक घुसवले. आमच्या लोकांना आत सोडलं नाही, असं शौमिका महाडिक म्हणाल्या.

शौमिका महाडिक सभास्थळी आल्या आणि…

शौमिका महाडिकही सभास्थळी आल्या आणि गोंधळातच गोकुळची सर्वसाधारण सभा सुरु झाली. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचं भाषण सुरू असतानाच शौमिका महाडिक यांनी बोलण्यासाठी माईकची विनंती केली. बराच वेळ मागणी केल्यानंतर शौमिका महाडिक यांना माईक मिळाला. पण त्यांचा आवाज मात्र कुणापर्यंतच पोहोचला नाही.

अखेर या सगळ्या गोंधळातच सत्ताधारी गटाने सर्व विषय मंजूर करण्यात आले. महाडिक गटानं त्याला सभास्थळीच जोरदार विरोध केला. सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर झळकावले. दुसरीकडे महाडिकांच्या कार्यकर्त्यांनीही महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक, अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांचे बॅनर झळकावले.

महाडिक गटाचे सतेज पाटील गटाला काही प्रश्न

महाडिक गटानं सभास्थळाच्या बाहेरही जोरदार बॅनरबाजी केली होती. या बॅनरवरुन सत्ताधारी सतेज पाटील गटाला काही प्रश्न विचारण्यात आले होते. आमचं दूध नाकारलं. राजकारण केलं. आणि बाहेरच्या राज्यातून साडेपाच कोटी लीटर दूध कशासाठी खरेदी केलं? 2 वर्षात किती लीटर वासाचे दूध परत केलं? रिजेक्ट केलेल्या दुधाचे पैसे कुणाच्या खिशात जातात? असे प्रश्न विचारण्यात आले.

पशुखाद्याची प्रत घसरली असताना दर मात्र इतर खासगी संघाइतकाच का? प्रत चांगली ठेवा मगच आमच्यावर विक्रीसाठी बंधने घाला. कर्मचाऱ्यांना काम करु द्या. सततच्या बदल्या आणि म्हशी घेण्यासाठी दबाव कधीपर्यंत आणणार? कर्मचाऱ्यांची पिळवणूक कधी थांबवणार? असे प्रश्न महाडिक गटानं बॅनर लावून विचारले होते.

सतेज पाटलांनी मात्र महाडिकांनी सभेत गुंड आणल्याचा आरोप केला. शौमिका महाडिकांनी हा आरोप फेटाळून लावला. सतेज पाटील 30 वर्षे सत्तेबाहेर होते. ते गुंड नाहीत. जुने सभासद आहेत, असं शौमिका महाडिक म्हणाल्या.

गोकुळची सर्वसाधारण सभा आणि वाद हे समीकरण आहे. गोकुळची सभा सुरळीत पार पाडणं हे कोल्हापूर पोलिसांसमोरचंही दिव्य असतं. याआधीच्या गोकुळच्या अनेक सभा वादळी ठरल्या आहेत. महाडिक सत्तेत असतानाही गोकुळ दूध संघाचे ठराव असेच गोंधळात मंजूर केले जायचे. सतेज पाटील सत्तेत आल्यावरही त्यात काहीही बदल झालेला नाहीय.