VIDEO | गटारीला रविवारचा योग, कोल्हापूरकरांचा ‘तांबडा पांढरा’ बेत, मटणाच्या दुकानांबाहेर एवssढी गर्दी

| Updated on: Aug 08, 2021 | 11:34 AM

कोरोना संकटामुळे अनेकांनी घरीच गटारी करण्याचा बेत केला आहे. त्यामुळे सकाळी सकाळीच मार्केटमधील दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी रांगा लावल्या आहेत. कोल्हापूरसह मुंबई-पुण्यातही मांसाहारी खवय्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे

VIDEO | गटारीला रविवारचा योग, कोल्हापूरकरांचा तांबडा पांढरा बेत, मटणाच्या दुकानांबाहेर एवssढी गर्दी
कोल्हापुरात मटणाच्या दुकानांबाहेर रांगा
Follow us on

कोल्हापूर : गटारी अमावस्या आणि रविवारचा योग आज जुळून आला आहे. तांबडा पांढरा रस्सा आणि चिकन मटणसाठी जगप्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात मांसाहार खरेदीसाठी खवय्यांनी एरवीपेक्षा जास्त गर्दी केली. एरवी बुधवार आणि रविवार म्हटला की कोल्हापुरातील चिकन मटण आणि फिश मार्केटमध्ये गर्दी ठरलेली असते, आज गटारी अमावस्येमुळे यात आणखी भर पडली आहे.

कोरोना संकटामुळे अनेकांनी घरीच गटारी करण्याचा बेत केला आहे. त्यामुळे सकाळी सकाळीच मार्केटमधील दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी रांगा लावल्या आहेत. गटारीच्या दिवशी कोल्हापूरकर 20 ते 25 टन चिकन आणि जवळपास 700 ते 800 बकऱ्यांचा फडशा पाडतात. नुकताच आलेला महापूर आणि कोरोना संकटामुळे यात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी कोल्हापूरकर गटारी साजरी करण्यासाठी सज्ज झाल्याचे एकूणच चित्र पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ :

मुंबईकर जोमात

मुंबईत गटारी अमावस्येनिमित्त बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गटारी आमावस्येला कोंबडं कापण्यासाठी गावठी कोंबड्यांची स्पेशल डिमांड आहे. यंदा गटारी अमावस्येला रविवार देखील आला आहे. त्यामुळे गटारी जोमात साजरी होत आहे. मांसाहार प्रेमींनी मांस, मच्छी घेण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. स्पेशल सांगली-साताऱ्याच्या कोंबड्यांना ग्राहकांची पहिली पसंती आहे.

पुणेकरांची गटारी जोशात

गटारी अमावस्येच्या मुहूर्तावर पुणेकरांनी सकाळपासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या. गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे आज मांसाहार प्रेमींनी सकाळपासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या. कोरोनामुळे निर्बंध असल्याने दुकानांच्या वेळा कमी आहेत. त्यामुळे लवकर मटण-चिकन मिळावं यासाठी लोक गर्दी करत आहेत. अनेकांनी आखाड पार्टीचेही आयोजन गटारीच्या निमित्ताने केलं आहे.

नागपुरातही गर्दी

नागपूरकरांनीही श्रावणापूर्वी सामिष भोजनाच्या शेवटच्या संधीचा लाभ घ्यायचे ठरवले आहे. त्यामुळे नागपुरातही सकाळपासून चिकन-मटणाच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या आहेत. विदर्भात मांसाहराचे शौकीन मोठ्या प्रमाणात आहेत. आज रविवार असल्याने आज सगळीकडे चिकन मटणाचा बेत आखण्यात आला आहे. सकाळपासून गर्दी व्हायला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत यात वाढ होईल, असे दुकानदार सांगतात. मात्र काही जणांनी श्रावणाच्या आधीचा बेत शुक्रवारीच आटपला. कारण विदर्भात आज जिवती हा सण साजरा केला जातो. मात्र तरीही गर्दी मात्र कमी नाही, असे मांसविक्रेत्यांचे म्हणणे आहे

सांगलीतही रांगा

सांगलीत अनेक मटण चिकन शॉपवर खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे अनेक मटण चिकन दुकाने ग्राहकांनी फुलून गेली आहेत. कोरोना नियम असल्याने अनेकांनी पार्सल सेवा दिली आहे तर अनेकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे मात्र पुढील एक महिना मटण चिकन खाता येणार नाही म्हणून अनेकांनी आजच ताव मारण्याचा बेत आखला आहे आणि यासाठी मटण चिकण खरेदी सांगलीत तरी जोमात दिसत आहे

संबंधित बातम्या :

पुणेकरांची गटारी फुल्ल जोशात; चिकन-मटणाच्या दुकानांबाहेर सकाळपासून रांगा