‘तुमच्या पुढं लोटांगण घालतो, पण आता घरातच थांबा’, अहमदनगरमध्ये सरपंचाची आर्तहाक

| Updated on: Apr 25, 2021 | 7:24 PM

गावात कोरोनाचं संसर्ग हाताबाहेर जाऊन नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून अहमदनगरमध्ये एक सरपंच गावात पारावर किंवा कट्ट्यावर बसणाऱ्यांपुढे लोटांगण घालून घरातच थांबण्याचं आवाहन करताना दिसत आहे.

तुमच्या पुढं लोटांगण घालतो, पण आता घरातच थांबा, अहमदनगरमध्ये सरपंचाची आर्तहाक
Follow us on

अहमदनगर : राज्यात सर्वत्र कोरोनानं थैमान घातलंय. रुग्णालयांमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही, त्यामुळे बेड मिळणं कठीण झालंय. अहमदनगरमध्येही कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वाढलीय. शहरातच नाही तर अगदी गावागावात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केलाय. रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन आणि औषधांसाठी प्रचंड धावपळ होत आहे. इतकं करुनही औषधांचा तुटवडा जाणवतोय. हे चित्र मन सुन्न करणारं आहे. त्यामुळेच गावात कोरोनाचं संसर्ग हाताबाहेर जाऊन नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून अहमदनगरमध्ये एक सरपंच गावात पारावर किंवा कट्ट्यावर बसणाऱ्यांपुढे लोटांगण घालून घरातच थांबण्याचं आवाहन करताना दिसत आहे (Sarpanch of Kamargaon Ahmednagar innovative idea to appeal people amid Corona).

“बाबांनो तुमचं कुटुंब तुमच्यावर अवलंबून, त्यांच्यासाठी तरी घरातच थांबा”

अहमदनगर तालुक्यातील कामरगाव येथे लोटांगण घालून नागरिकांना आवाहन करणाऱ्या या सरपंचाचं नाव तुकाराम कातोरे असं आहे. कातोरे सध्या गावात कोरोना नियंत्रणाबाहेर जाऊ नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून गावात बसलेल्या नागरिकांना हात जोडून, पाया पडून आणि गरज पडली तर अगदी ग्रामस्थांपुढे लोटांगण घालून घरी थांबण्याची विनंती करत आहेत. “बाबांनो तुमच्यावर तुमचं कुटुंब अवलंबून आहे. त्यांच्यासाठी व गावासाठी तरी घरातच थांबा. रस्त्यावर येऊन कोरोनाचा प्रसार करू नका,” अशी आर्तहाक ते देत आहेत.

सरपंच कातोरे यांच्या आवाहनाला आता नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

सार्वजनिक ठिकाणी कातोरे हे दररोज जाऊन लोकांना मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करा, किरकोळ दुखणे अंगावर काढू नका. त्यासाठी रॅपिट टेस्ट, एचआरसीटी टेस्ट (HRCT), सिटी स्कॅन करुन घ्या असं आवाहन करतात. त्यांच्या या आवाहनाला लोक आता हळूहळू सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गप्पांचे फड ओसरु लागले आहेत. मोबाईलवर खेळणारी तरुणाई देखील कोरोना पसरु नये म्हणून खबरदारी घेत आहे.

कातोरेंच्या उपक्रमाची अहमदनगरमध्ये जोरदार चर्चा

कायद्याचा धाक आणि पोलिसांची भीती दाखवून रस्त्यावर मोकाट फिरणारी माणसं मुळातून बदलत नाहीत. तर त्यांच्यातील शहाणपणाला आवाहन करत सौजन्याने जागृकता आणण्याचा सरपंच कातोरे यांचा हा उपक्रम सध्या अहमदनगरमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. लोक जोपर्यंत स्वतःहून बदलत नाही तोपर्यंत कोरोनाचे युद्ध थांबणार नाही. त्यासाठी कामरगाव येथील सरपंच यांनी राबवलेला या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

“माणूस आतून बदलत नाही तोपर्यंत कोरोनाला रोखणे अवघड”

कातोरे यांच्या या उपक्रमाप्रमाणेच आता जिल्ह्यासह राज्यातही नागरिकांना घरातच थांबण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. प्रशासनाने बाहेरून कितीही दबाव आणला तरी जोपर्यंत माणूस आतून बदलत नाही तोपर्यंत कोरोनाला रोखणे अवघड आहे. सर्वांच्या हितासाठी लोकांनी स्वतःहून बदलणे आवश्यक आहे. कातोरे यांच्या या प्रयत्नानंतर इतरही सरपंच आपल्या स्तरावर असे प्रयत्न करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

‘आमचे रुग्ण मरु द्यायचे का?’ अहमदनगरमध्ये रेमडेसिवीरची मागणी आणि पुरवठ्यात मोठं अंतर, नातेवाईकांचा संताप

“मी वाचाळवीर नाही, तर शब्दाचा पक्का”, आमदार लंकेंनी ग्रामपंचायत निवडणुकीतील शब्द पाळला

VIDEO | अहमदनगरमध्ये तहसीलदार ज्योती देवरेंकडून कोरोनाबाधित वृद्धावर अंत्यसंस्कार

व्हिडीओ पाहा :

Sarpanch of Kamargaon Ahmednagar innovative idea to appeal people amid Corona