Chandrapur bank : चंद्रपुरात मजुराला बँक खात्यात शंभर कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज, हा आनंद काही क्षणासाठीच ठरला, कारण काय?

| Updated on: Sep 03, 2022 | 3:37 PM

बँक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर राजू मेश्राम घाबरला. लगेच आपल्या एका सहकाऱ्यासह बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली.

Chandrapur bank : चंद्रपुरात मजुराला बँक खात्यात शंभर कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज, हा आनंद काही क्षणासाठीच ठरला, कारण काय?
चंद्रपुरात मजुराला बँक खात्यात शंभर कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज
Follow us on

चंद्रपूर : मजुरी करून पोटाची खडगी भरणाऱ्या एका मजुराला, तुम्हच्या बँक खात्यात (Bank Account) शंभर कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. शंभर कोटी ही काही लहान रक्कम नाही. हा मेसेज बघून कुणालाही आनंदाचा उकड्या येतील. तसे मजुरालाही आल्यात. मात्र शंभर कोटींचा हा आनंद काही क्षणापुरताच ठरला. मजुराने बँक गाठली अन् शाखा व्यवस्थापकाने (Branch Manager) जे सांगितलं. त्यामुळे त्याच्या आनंदावर विरजन पडले. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात घडला आहे. या प्रकाराची खमंग चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. नागभीड तालुक्यातील एका मजुराला ऑनलाइन व्यवहाराचा (Online Transactions) मोठा फायदा झाला होता. त्याच्या बँक खात्यात गुगल पेद्वारे चक्क शंभर कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला. मेसेज बघीतल्यावर त्याचा आनंदाला उधाण आले. मात्र या मजुराने जेव्हा बँकेचे कार्यालय गाठले तेव्हा मात्र त्याचा आनंदावर विरजन पडले.

मॅनेजरने रकमेचे विवरण विचारले

नागभीड तालुक्यात येणाऱ्या मांगली येथील रहिवासी राजू देवराव मेश्राम (वय 40) हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा व्यक्ती आहे. त्याची आर्थिक स्थिती बेताची आहे. अश्यात बँक ऑफ इंडियाच्या नागभीड येथील शाखेत त्याचे बँक खाते आहे. गुरुवारी त्याच्या बँक खात्यात गुगल पेच्या माध्यमातून 99 कोटी 98 लाख 106 रुपये जमा झाल्याचा मेसेज भ्रमणध्वनीवर आला. संदेश बघून क्षणभर त्याला ही विश्वास बसला नाही. त्याने गावातील काही नागरिकांना याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी बँक ऑफ इंडियाच्या नागभिड शाखेतून राजू मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी तुमच्या बँक खात्यात 99 कोटी 98 लाख 106 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती दिली. मोठ्या रक्कमेचे विवरण सादर करण्यास सांगण्यात आले.

तांत्रिक चुकीमुळं पैसे होल्ड

बँक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर राजू मेश्राम घाबरला. लगेच आपल्या एका सहकाऱ्यासह बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली. मेश्रामने प्रामाणिकपणाने ही रक्कम आपली नसल्याचं बँक अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी नंतर ज्या खात्यातून ती रक्कम आली त्याच खात्यामध्ये ती रक्कम वळती केल्याची माहिती आहे. या बाबत बँकेचे शाखा व्यवस्थापक लांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सदर खातेदाराच्या खात्यात बँकेकडून कुठलीही रक्कम जमा झाली नाही. मात्र काही तांत्रिक चुकीमुळे पैसे होल्ड झाल्याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर गेला. यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी खातेदाराला सविस्तर सर्व माहिती दिली.

हे सुद्धा वाचा