विद्यार्थ्यांनी केले अॅड्राईड अॅपचा वापर करून मतदान, अशी झाली खऱ्याखुऱ्या मतदान प्रक्रियेची ओळख

| Updated on: Sep 18, 2022 | 6:30 PM

9 पदांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते.निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांकडून नामनिर्देशन फॉर्म भरून घेण्यात आले. उमेदवारांना 3 दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला.

विद्यार्थ्यांनी केले अॅड्राईड अॅपचा वापर करून मतदान, अशी झाली खऱ्याखुऱ्या मतदान प्रक्रियेची ओळख
या आदिवासी भागात करण्यात आला इव्हीएमचा वापर!
Image Credit source: t v 9
Follow us on

गडचिरोली : शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी इव्हीएमचा वापर.! झालात ना सर्व चकीत ! हो, हे अगदी खरे आहे. शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती मिळावी म्हणून हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला. चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत जि.प.केंद्र शाळा चामोर्शी येथे आज शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. या उपक्रमात ‘वोटिंग मशीन’ या ॲन्ड्रॉईड ॲपचा वापर करून विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला.

निवडणूक म्हणजे काय? मोठी माणसे मतदान कसे करतात? ईव्हीएम मशीन कशी असते? मतमोजणी कशी करतात? शाई का लावतात? आणि एकूण प्रक्रिया कशी असते? असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात.

शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक प्रवीण पोटवार यांनी शालेय विद्यार्थ्यांना ईव्हीएमद्वारे निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांना बोलून दाखवला. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने ही प्रक्रिया राबविली गेली.

पाचवी ते सातवीपर्यंत मुख्यमंत्री, विद्यार्थिनी प्रतिनिधी,शिक्षणमंत्री,सांस्कृतिक मंत्री, पर्यटनमंत्री,आरोग्यमंत्री, स्वच्छता मंत्री,शालेय पोषण आहार मंत्री, क्रीडामंत्री,अशी 9 पदे निवडली गेली.

या 9 पदांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते.निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांकडून नामनिर्देशन फॉर्म भरून घेण्यात आले. उमेदवाराना 3 दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला.

वोटिंग मशीन ऍपद्वारे ईव्हीएम तयार करत त्यात फोटोसह उमेदवार यादी तयार करून घेतली. वर्गात प्रत्यक्ष कसे मतदान करतात, हे मॉकपोलसह प्रोजेक्टरने दाखवले.

बॉलेट बटन दाबल्यानंतर पसंतीच्या उमेदवाराच्या पुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो आणि विशिष्ट आवाज होतो. हे प्रोजेक्टर वरून सर्वांना सांगून नंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू केली.

वर्गात स्वतंत्र मतदान कक्ष उभारण्यात आले होते. मतदानापूर्वी मतदार यादी जाहीर करण्यात आली. एकूण 9 पदासाठी 9 EVM मशीन ठेवले होते.

शाळेतील 100 विद्यार्थ्यांनी मतदानात भाग घेतला. मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लावून दरवाज्याजवळ दोन विद्यार्थ्यांना पोलीस बनवले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. शाळेतील शिक्षक मंगलकुमार मानमपल्लीवार यांनी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले.

मार्कर पेनने त्यांनी बोटावर शाई लावली. शाळेतील मुख्याध्यापक वत्सला तांबडे,शाळेतील शिक्षक तुषार चांदेकर,दादाजी शेडमाके, अरुण खोब्रागडे, विनोद ब्राम्हनवाडे,निर्मला कोंडावार,नम्रता मार्तीवार,वंदना रामटेके,पुष्पलता लंजे, शालू कोडापे,प्रविण पोटवार यांनी बॉलेट युनिट सांभाळले.

विद्यार्थी खूप उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभागी झाले. प्रत्येक मतदार नऊ जागांसाठी मतदान करत होता.कोणतेही बोगस मतदान किंवा ज्यादा मतदान केले नाही. मतदान संपल्यावर ठिक 9 वाजता क्लोज (Close) बटन दाबून EVM मशीन सील करण्यात आली.

त्यानंतर काही वेळातच सर्व विद्यार्थ्यांना मैदानात बोलावून उमेदवाराच्या समक्ष निवडणुकीच्या निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली.निवडणूक जिंकलेले विद्यार्थी निकाल ऐकताच एकच जल्लोष करीत होते.

यावेळी मुख्यमंत्री-नोमेश बारसागडे,विद्यार्थिनी प्रतिनिधी-ज्ञानेश्वरी मोते, आरोग्यमंत्री- आयुष्य गेडाम,शिक्षणमंत्री-हिरण्या पिपरे,पर्यटनमंत्री-देवयानी चलाख,सांस्कृतिक मंत्री-स्नेहल घ्यार,क्रीडामंत्री-प्रेम मुनगेलवार,स्वच्छता मंत्री-अनंत पोगुलवार, शालेय पोषण आहार मंत्री-यश नैताम यांना बहुमताने विजय घोषित करण्यात आले.

निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी गुलाल लावून आनंद साजरा केला. निवड झालेल्या शालेय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना शाळेतील शिक्षक तुषार चांदेकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

निवडून आलेल्या विद्यार्थ्यांनी कामे कशी करायची, शिक्षकांना मदत केव्हा करावी, शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य कसे करावे या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मंदाताई वाणखेडे, स्नेहल जोशी,शाळेच्या मुख्याध्यापिका वत्सला तांबडे यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना निवडीचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.