दारू विक्रेत्यापासून पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत… प्रत्येकाची चौकशी होणार, महाजन यांचं मोठं विधान, मृतांचा नेमका आकडाही आला समोर
Girish Mahajan : पुण्यातील विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 18 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. तसेच राज्य सरकारकडून या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याचीही माहिती महाजन यांनी दिली आहे. मंत्री महाजन नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर
गिरीश महाजन यांनी म्हटले की, ‘फुगेवाडी विषारी दारुकांड प्रकरणातील मृत्यूच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेने ही 1 लाखांची मदत आधीचं जाहीर केलेली आहे. महापालिकेत नोकरी देण्याच्या दृष्टीने ही विचार केला जाईल अशी माहितीही दिली आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आतापर्यंत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहितीही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
प्रत्येकाची चौकशी होणार
पुढे बोलताना महाजन यांनी म्हटले की, पोलिसांचं अभय असल्याशिवाय हे होणार नाही. याआधी असे मृत्यू झाले असतील, मात्र एकाचं दिवशी मृत्यू झाल्यानं ही बाब उजेडात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनमध्ये यायला हवं, मात्र ते आले नाही. आता सीआयडी हा तपास करणार आहे. प्रत्येकाची चौकशी केली जाईल. या चौकशीत कोण उच्चपदस्थ की कोण कनिष्ठ हे पाहिलं जाणार नाही. पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातील सर्व ठिकाणचे दारू अड्डे उद्धवस्त केले जातील.
मिथेनॉल साठा जप्त
पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर दारूत मिसळेल्या मिथेनॉल साठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या साठवलेला मिथेनॉल साठा जप्त केला आहे. एफडीएने भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीवर छापा टाकून 1,526 किलो संशयित मिथेनॉलचा साठा जप्त केला. याच रेक्स इंटरनशल कंपनीकडून मिथेनॉल विकत घेऊन पुण्यातली विषारी दारू बनवल्याचे समोर आले आहे. आता कंपनीचे मालक व संबंधितांविरोधात भिवंडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.