काडीमोडाच्या उंबरठ्यावरील 807 संसार रुळावर, पुणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ची कामगिरी

| Updated on: Jan 11, 2021 | 9:53 AM

पती-पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी पुणे पोलिसांनी खास कक्ष स्थापन केला आहे. त्याला भरोसा सेल असं नाव देण्यात आलं आहे

काडीमोडाच्या उंबरठ्यावरील 807 संसार रुळावर, पुणे पोलिसांच्या भरोसा सेलची कामगिरी
Follow us on

पुणे: अगदी छोट्या-मोठ्या शुल्लक कारणांवरुन पती-पत्नीमध्ये विसंवाद आणि प्रकरण काडीमोडापर्यंत गेल्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण असे विस्कटू पाहणारे जवळपास आठशे संसार पुन्हा रुळावर आणण्याची कमाल पुणे पोलिसांनी केली आहे. पुणे पोलिसांच्या भरोसा सेलच्या महिला सहायता कक्षाकडे गेल्या वर्षभरात तब्बल 2 हजार 73 अर्ज आले होते. त्यातील 807 जोडप्यांमधील वाद मिटवून हे संसार पुन्हा मार्गी लावण्याचं काम भरोसा सेलने केलं आहे. या सेलमधील ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे 662 अर्ज आले आहेत. त्यातील 330 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.(The excellent performance of the Pune Police Bharosa Cell)

पती-पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी पुणे पोलिसांनी खास कक्ष स्थापन केला आहे. त्याला भरोसा सेल असं नाव देण्यात आलं आहे. या सेलकडून समुपदेशनाच्या माध्यमातून कुटुंबातील बिघडलेले नातेसंबंध सुधारण्याचे आणि कौटुंबिक वातावरण सुदृढ करण्याचे काम करण्यात येते. तसंच जेष्ठ नागरिकांच्या समस्यांची सोडवणूकही या सेलद्वारे केली जाते.

पोलिस उपायुक्तांची माहिती

पुणे पोलिसांनी सुरु केलेल्या या भरोसा सेलचा दुसरा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. त्यावेळी पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्यासह सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, समुपदेशिका प्रार्थना सदावर्ते, सहाय्यक निरीक्षक सुजाता शामने, स्वाती केदार उपस्थित होते. त्यावेळी उपायुक्त बच्चन सिंग यांनी भरोसा सेलच्या कामगिरीची माहिती दिली. भरोसा सेलल्या महिला कक्षाकडे गेल्या वर्षभरात 2 हजार 73 अर्ज आले होते. त्यातील 807 प्रकरणांमध्ये पती-पत्नीच्या नात्यात पुन्हा गोडवा आणण्यात या सेलला यश आलं आहे. तर सध्या 800 अर्जांवर काम सुरु आहे.

दामिनी पथकाचीही दमदार कामगिरी

शहर आणि महाविद्यालय परिसरात अनेक टुकार मुलं कॉलेज तरुणींची छेड काढत असल्याचा प्रकार सातत्यानं घडत असतो. अशा टवाळखोरांना धडा शिकवण्यासाठी राज्यभरात खास महिला पोलिसांचं दामिनी पथक तयार करण्यात आलं आहे. पुण्यातील दामिनी पथकाने कॉलेज आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून महिला आणि मुलींशी छेडछाड करणाऱ्या 1 हजार 229 जणांवर कारवाई केली आहे.

जेष्ठ नागरिकांचं समाधान

2020 मध्ये जेष्ठ नागरिक कक्षाकडे 362 तक्रार अर्ज आले होते. त्यापैकी 330 अर्जांमध्ये जेष्ठ नागरिकांचं समाधान करण्यात या सेलला यश मिळालं आहे. जेष्ठ नागरिकांच्या हेल्पलाईनवर बरेच फोन कॉल आले असून, त्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्याची माहितीही बच्चन सिंग यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

पोलिस निरीक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी इंदापूर शहरात कडकडीत बंद, पाहा काय आहे प्रकरण

‘पुणे तिथे काय उणे’! पुणे महाराष्ट्रातील सर्वात ‘आनंदी’ जिल्हा

The excellent performance of the Pune Police Bharosa Cell