“चंद्रकांतदादा कुठूनही निवडून येऊ शकतात, पण जयंतरावांच्या बॉसला अजून जमत नाही”

| Updated on: Feb 15, 2021 | 4:19 PM

पण तुमचे सर्व मंत्री आणि सरकार एअर कंडिशन बंगल्यात स्वत: च्या जिवाची चिंता करत होते. (Ram Kadam Criticise Sharad Pawar)

चंद्रकांतदादा कुठूनही निवडून येऊ शकतात, पण जयंतरावांच्या बॉसला अजून जमत नाही
चंद्रकांत पाटील, शरद पवार, जयंत पाटील
Follow us on

मुंबई : “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारलेला बाण अचूक वर्मी लागलेला दिसतो आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील जे बोलले, त्यातून एकच सिद्ध होते की, चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंत पाटील यांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही,” अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली. (Ram Kadam Criticise Sharad Pawar)

रविवारी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांवर खोचक टीका केली. त्यावर जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांवर निशाणा साधला होता. या टीकेला राम कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर देत शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

“आम्ही व्यक्तिविशेष कधीही टिप्पणी करत नाही. पण राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे विधान ज्या पद्धतीने त्यांनी स्वत: हून आपल्या वक्तव्यावरुन हे महाराष्ट्राला सांगितले, भाजप चंद्रकांत पाटील कोणत्याही मतदारसंघातून निवडून येतात. पण त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा इतर कोणत्याही मतदारसंघात उभं राहण्याची हिंमतही करत नाही. नेमकं चंद्रकांत पाटील यांचे हे विधान जयंत पाटील यांच्या मर्मी खूप खोलवर लागले दिसतं आहे,” असे खोचक टोला राम कदम यांनी लगावला.

“तुमचे मंत्री कोरोनाकाळात स्वत: च्या जिवाची चिंता करत होते”

“आमचा जयंत पाटील यांना सवाल तुम्ही या आधी चंद्रकांत पाटील यांचा वय काढलंत. पण त्यांचं वय काहीही असलं, तरी स्वत: जिवाची चिंता न करता चंद्रकांत दादा कोरोना काळात महाराष्ट्राच्या गावोगावी फिरत होते. पण तुमचे सर्व मंत्री आणि सरकार एअर कंडिशन बंगल्यात स्वत: च्या जिवाची चिंता करत होते. हे अजूनही महाराष्ट्र विसरला नाही,” असेही राम कदम म्हणाले.

“तुमच्या विधानातून तुमचे नेते इतर मतदारसंघात उभे राहू शकत नाही. निवडून येऊ शकत नाही ही उद्विग्नता महाराष्ट्राच्या समोर येते हे मात्र निश्चित,” असेही वक्तव्य राम कदम यांनी केले.

जयंत पाटील काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत स्वत:चा जिल्हा सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली. चंद्रकांतदादांनी स्वत:चं बघावं. शरद पवार यांची मापं काढू नयेत, असा सल्लाच जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

शरद पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली!

‘ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू’, अशा शब्दात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता. महत्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं, असंही पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर खोचक टीका केली. ‘माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये’, अशा शब्दात चंद्रकांतदादांनी पवारांना टोला हाणला.

त्यावर आता जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर शरसंधान साधलंय. एका महिला लोकप्रतिनिधीनं तयार केलेल्या सुरक्षित मतदारसंघात जाऊन, त्या महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणं हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल जयंत पाटलांनी विचारला आहे. चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय. (Ram Kadam Criticise Sharad Pawar)

संबंधित बातम्या :  

एका महिलेच्या सुरक्षित मतदारसंघातून जिंकणं, यात काय पुरुषार्थ? जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

गोपीचंद पडळकरांनी नीट बोलावं, पवारांवर टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी टोचले कान