कोरोना लस घेतली तरच रेशन अन् सातबारा; नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचा निर्णय

| Updated on: Nov 04, 2021 | 3:44 PM

कोरोना लस घेतली तरच रेशन आणि सातबारा मिळेल, असा निर्णय नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातल्या सावकी ग्रामपंचायतीने घेतला आहे.

कोरोना लस घेतली तरच रेशन अन् सातबारा; नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचा निर्णय
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

नाशिकः कोरोना लस घेतली तरच रेशन आणि सातबारा मिळेल, असा निर्णय नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातल्या सावकी ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांमधील वाढ कमी होताना दिसत नाही आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 25, बागलाण 8, चांदवड 24, देवळा 20, दिंडोरी 20, इगतपुरी 7, कळवण 5 , नांदगाव 11, निफाड 110, सिन्नर 94, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 4, येवला 32 अशा एकूण 361 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 274, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 7 तर जिल्ह्याबाहेरील 36 रुग्ण असून एकूण 678 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेषतः निफाड, सिन्नर तालुक्यात सातत्याने रुग्ण वाढ होत आहे. अनेक जण येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा इशारा देत आहेत. हे पाहता ग्रामपंचायतीचे प्रशासक जे. एस. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पास करण्यात आला. त्यात लस घेतलेल्या नागरिकांनाच रेशन आणि सातबारा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

असा आहे नियम

एखाद्याने फक्त पहिला डोस घेतला असेल. अथवा दुसऱ्या डोसचा कालावधी उलटूनही तो घेतला नसेल, तर त्या व्यक्तीला रेशन, तलाठ्याकडून देण्यात येणारा सातबारा, ग्रामपंचायतीचे कोणतेही शासकीय दाखले, कागदपत्रे देण्यात येणार नाहीत. सोबतच ग्रामपंचायतीच्या कसल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. या ग्रामसभेला ग्रामसेवक वैशाली पवार, तलाठी कल्याण कोळी, पोलीस पाटील अश्विनी बच्छाव, आरोग्यसेवक दिनेश शेवाळे यांची उपस्थिती होती. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या ठरावाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

नियम पालनाचे आवाहन

सध्या परदेशात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आपल्या देशातही अनेक राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. सध्या महाराष्ट्र सरकारने निर्बंधामध्ये सूट दिली आहे. हे पाहता लोकांंनी कोरोना नियमांचे पालन करूनच व्यवहार करावेत. सर्वांनी मास्क आवश्य वापरावा. एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Ration and Satbara A form will be available only if Corona is vaccinated; Decision of Gram Panchayat in Nashik district)

इतर बातम्याः

महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये 43 प्रभाग 3 सदस्यीय, तर 1 असेल चौघांचा!

दिवाळीनंतर नाशिकमध्ये पाडापाडी; सोमवारपासून अतिक्रमणांवर महापालिकेचे बुलडोझर!

कृषिमंत्री म्हणतायत 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, तर विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे भुसे यांच्या घरासमोर आंदोलन