सांगलीत ‘थर्टी फर्स्ट’ला समाजकंटकांचा हैदोस, दहा गाड्या फोडल्या, स्कॉर्पियो पेटवली

| Updated on: Jan 01, 2020 | 8:59 AM

मध्यरात्रीच्या सुमारास सांगलीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी दहा वाहनांची तोडफोड केली, तर एक स्कॉर्पिओ गाडी जाळली.

सांगलीत थर्टी फर्स्टला समाजकंटकांचा हैदोस, दहा गाड्या फोडल्या, स्कॉर्पियो पेटवली
Follow us on

सांगली : सांगलीत समाजकंटकांनी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री अक्षरशः हैदोस घातला. शंभर फूटी रोडवर दहा गाड्यांची तोडफोड केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एका गाडीची जाळपोळही (Sangli Car set on fire) करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

देशभरात काल नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष पाहायला मिळत होता. त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास सांगलीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी दहा वाहनांची तोडफोड केली, तर एक स्कॉर्पिओ गाडी जाळली. यामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. तर अग्निशमन विभागाने स्कॉर्पिओला लावलेली आग विझवली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. तोडफोडीचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं असून पोलिस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

रस्त्यावरुन जात असताना, सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी यांच्या गाडीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न या हल्लेखोरांनी केला. कोरी यांनी पोलिसांना तोडफोड सुरु असल्याची माहिती दिली. मात्र पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत हल्लेखोर पळून गेले. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. Sangli Car set on fire