‘अपुऱ्या कपड्यांमध्ये अश्लिल हावभाव करुन…’, सुरेखा पुणेकर पुन्हा गौतमी पाटील हिच्यावर भडकल्या

| Updated on: Nov 23, 2022 | 5:37 PM

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी पुन्हा एकदा इन्स्टास्टार गौतमी पाटीलवर निशाणा साधलाय.

अपुऱ्या कपड्यांमध्ये अश्लिल हावभाव करुन..., सुरेखा पुणेकर पुन्हा गौतमी पाटील हिच्यावर भडकल्या
Follow us on

सोलापूर : इन्स्टास्टार गौतमी पाटील ही सध्या चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आलीय. तिचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेक तरुणांकडून तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहेत. गौतमीच्या नावाने इन्स्टाग्रामवर अनेक अकाउंटदेखील आहेत. त्या अकाउंटवरुन तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण तिच्या डान्स करण्याच्या पद्धतीवर लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय.

प्रख्यात तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर यांनी इन्स्टास्टार गौतमी पाटील हिच्यासह नव कलावंतांवर आग ओकलीय. “अपुऱ्या कपड्यांमध्ये अश्लिल हावभाव करुन लावणी सादरीकरण करु नका. अन्यथा येत्या काळात महाराष्ट्रातील महिला अशा कलाकारांना स्टेजवरुन खाली ओढून गावोगावी मारतील”, असा इशारा सुरेखा पुणेकर यांनी दिलाय.

“सध्याच्या कलाकार तरुणींकडून चुकीचं घडतंय. लावणीचे विद्रुपीकरण झाल्यास महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही”, असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

“ज्या कलाकार मुलींकडे कला आहे तिलाच प्रोत्साहन द्या. तिला डोक्यावर घ्या. अपुरे कपडे घालून घाणेरडे विचार पेरणाऱ्या कलाकारांना अजिबात थारा देऊ नका”, असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

सुरेखा पुणेकर यांची गौतमी पाटील हिच्यावर टीका करणारी ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील सुरेखा पुणेकर यांनी गौतमी पाटीलवर टीका केली होती. त्यावेळी गौतमी हिचा अश्लिल हावभाव करत डान्स करण्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे सुरेखा पुणेकर आणि इतर कलाकारांनी गौतमीवर टीका केली होती.

विशेष म्हणजे सुरेखा पुणेकर यांनी टीका केल्यानंतर गौतमी पाटीलने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडे शरण जात जाहीर माफी मागितली होती. गौतमीने रुपाली पाटील यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली होती.

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचं एक गाणं प्रदर्शित झालं. त्या गाण्याच्या निमित्ताने गौतमी हिने पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी तिने आपला जीवनप्रवास उलगडून सांगितला होता. गौतमी आपला प्रवास सांगताना भावनिक झाल्याचं देखील बघायला मिळालं होतं.