मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो, भुसे म्हणाले, असं केलं असेल तर… पुन्हा वाद पेटणार?

मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो, भुसे म्हणाले, असं केलं असेल तर... पुन्हा वाद पेटणार?
Tipu Sultans photo Malegaon Municipal
Image Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड | Updated on: Aug 25, 2026 | 10:32 PM

मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयात आज त्यांनी प्रवेश केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांच्या छायाचित्रांसोबत टिपू सुलतान यांचा फोटोही लावण्यात आला आहे.

उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे काम काही दिवसांपासून सुरू होते. नूतनीकरणानंतर कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावणार असल्याचे शान-ए-हिंद यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आला आहे. यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Loading...

यापूर्वीही फोटोवरून वाद

टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून यापूर्वी मालेगावमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता पुन्हा महापालिकेच्या उपमहापौर दालनात त्यांचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिले असल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावण्यात आल्याचा दावा उपमहापौर शान-ए-हिंद यांनी पुन्हा एकदा केला आहे. महापुरुषांच्या छायाचित्रांसोबत टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दादा भुसे काय म्हणाले?

या सर्व प्रकरणावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भाष्य केले आहे. याबाबत तात्काळ माहिती घेतली जाईल आणि तसे केले असेल तर फोटो काढायला सांगतो असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता दादा भुसे हे टिपू सुलतान यांचा फोटो काढण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात टिपू सुलतान यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसोबत लावण्यात आला होती. याचा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी तीव्र विरोध केला होता. टिपू सुलतान यांचे छायाचित्र शासकीय प्रोटोकॉलच्या यादीत नसल्याचे सांगत ते तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली. या मुद्द्यावरून मालेगाव आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बरेच तापले होते. वाढत्या विरोधामुळे आणि आंदोलनांच्या इशाऱ्यामुळे अखेर तो फोटो उपमहापौरांच्या दालनातून हटवण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us