Nitesh Rane | नितेश राणे अजूनही बेपत्ता, आज अटकपूर्व जामीन होणार का? महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा सिंधुदुर्गकडे !

| Updated on: Dec 30, 2021 | 7:26 AM

नितेश राणे यांना जामीन मिळणार का ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून सर्वांच्या नजरा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळल्या आहेत. तर दुसरीकडे आज राणेंच्या जामिनावर निकाल देण्यात येणार असला तरी अजूनही ते बेपत्ताच आहेत.

Nitesh Rane | नितेश राणे अजूनही बेपत्ता, आज अटकपूर्व जामीन होणार का? महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा सिंधुदुर्गकडे !
नितेश राणे, आमदार
Follow us on

मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणात राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात 27 डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर आज निर्णय देण्यात येणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार का ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून सर्वांच्या नजरा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळल्या आहेत. तर दुसरीकडे आज राणेंच्या जामिनावर निकाल देण्यात येणार असला तरी अजूनही ते बेपत्ताच आहेत.

राणेंकडून वकिलांची फौज, लवकरच निकाल येणार 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावरदेखील अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी केलेल्या अटकपूर्व जामिनावर सलग दोन दिवस सुनावणी घेण्यात आली. 29 डिसेंबर रोजी दोन्ही बाजूने युक्तीवाद पूर्ण झाला असून त्यावर आज निर्णय दिला जाणार आहे. त्यामुळे राणे यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पुढच्या काही तासांत ते स्पष्ट होईल. जामीन मिळावा यासाठी राणे यांनी विकालांची फौज उभी केली होती. यामध्ये संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे, उमेश सावंत अशा बड्या वकिलांचा समावेश आहे. तर सरकारी पक्षातर्फे प्रदीप घरत, भूषण दळवी, गजानन तोडकर यांनी बाजू मांडली होती.

नितेश राणे अजूनही बेपत्ताच !

संतोष परब हल्ला प्रकरण समोर आल्यापासून नितेश राणे बेपत्ता आहेत. त्यांचा ठावठिकाणा अजूनही कोणाला लागलेला नाही. मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्ग पोलीस त्यांचा सातत्याने शोध घेत आहेत. या प्रकरणात नितेश राणे यांचे पिता तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनादेखील नोटीस जारी करण्यात आलीय. त्यांनी नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याबद्दल पत्रकार परिषदेत एक वक्तव्य केले होते. नितेश राणे हे कुठे आहेत, हे सांगायला मी काय मुर्ख आहे का ? असे नारायण राणे म्हणाले होते. याच कारणामुळे त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती.

दरम्यान, नारायण राणे यांनी व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नाही, असे नोटिशीला उत्तर दिलेले आहे. तर दुसरीकडे नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याची अद्याप माहिती नसल्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळाच तर पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

OBC | महाराष्ट्रात लवकरच नवी ओबीसी संघटना, विजय वडेट्टीवार मार्गदर्शक, नाव आणि भूमिका काय ?

30 December 2021 Panchang : कसा जाणार गुरुवारचा दिवस? , काय सांगंतय पंचांग, जाणून घ्या ​​शुभ मुहूर्त आणि राहुकालच्या वेळा

Maharashtra News Live Update: पुणे म्हाडाच्या वतीने 4222 घरांसाठी सात जानेवारीला सोडत; अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ