Dam : मध्य प्रदेशात 304 कोटींचे धरण फुटण्याचा धोका, 18 गावे रिकामी करण्यात आली, हायवेवरील वाहतूक थांबवली, रस्ता बंद, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर तैनात

| Updated on: Aug 12, 2022 | 7:46 PM

धरणाची गळती मोठ्या प्रमाणात सुरु राहिली तर गावांत पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पाणी कसे कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी धरणाच्या बाजूने एक कॅनॉल बाहेर काढण्यात येतोय. पाणी कमी झाले तर धरण तुटले तरी पुराचा धोका कमी होईल. हे धरण अद्याप बांधकामाच्या अवस्थेत आहे, त्यापूर्वीच पावसामुळे इथे पाणी जमा झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Dam : मध्य प्रदेशात 304 कोटींचे धरण फुटण्याचा धोका, 18 गावे रिकामी करण्यात आली, हायवेवरील वाहतूक थांबवली, रस्ता बंद, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर तैनात
धरण फुटण्याची भीती
Image Credit source: social media
Follow us on

धार- मध्यप्रदेशातील धार (Dhar, MP) परिसरात भरुडपाडा आणि कोठीदाच्या मध्ये असलेल्या कारम नदीवरील धरणातून (Dam on Karam river)गळती वाढत चाललेली आहे. शुक्रवारी सकाळी धरणाच्या एका बाजूची माती वाहून गेली आहे. यामुळे धरणाच्या भिंतीचा मोठा भाग कोसळला असल्याची माहिती आहे. धरण फुटण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने परिसरातील 18 गावे रिकामी (evacuated)केली आहेत. यात धार जिल्ह्यातील 12 आणि खरगोन जिल्ह्यातील 6गावांचा समावेश आहे. यामुळे सुमारे 40 हजार ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे. धरण फुटले तर ते पाणी ज्या नदीतून जाईल, त्याच्यावर आगरा मुंबई राष्ट्रीय महामार्गाचा पूल आहे. तिथे वाहने वाहून जाऊ नयेत यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या पुलावरुन वाहतूक कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी जमा झाली आहे. एयरफोर्सचे दोन हेलिकॉप्टर मदतीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत, अशी माहिती राज्याच्या अप्पर गृह सचिवांची दिली आहे.

धरणातील पाणी कमी करण्याचा प्रयत्न सुरु

धरणाची गळती मोठ्या प्रमाणात सुरु राहिली तर गावांत पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पाणी कसे कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी धरणाच्या बाजूने एक कॅनॉल बाहेर काढण्यात येतोय. पाणी कमी झाले तर धरण तुटले तरी पुराचा धोका कमी होईल. हे धरण अद्याप बांधकामाच्या अवस्थेत आहे, त्यापूर्वीच पावसामुळे इथे पाणी जमा झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत लगेचच धरण फुटेल अशी स्थिती नसल्याचाही दावा करण्यात येतो आहे. चार पोकलेन मशिनींच्या सहाय्याने कॅनॉल खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दुसरीकडे ढासळलेल्या भागाच्या डागडुजीचे कामही युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. सध्या पाऊस थांबला आहे, मात्र पावसाने पुन्हा जोर धरल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील 10 तास महत्त्वाचे मानण्यात येत आहेत. सर्व आपतकालीन यंत्रणा सध्या या परिसरात तळ ठोकून आहेत.

4 वर्षांपासून सुरु आहे धरणाचे काम

धार जिल्ह्यात 304.44 कोटींच्या निधीतून कारम नदीवर धरण बांधण्यात येते आहे. हे काम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. हे धरण पूर्ण झाल्यावर 52 गावांतील 10  हजार 500 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

इंदूरपासून 78 किमी अंतरावर थांबवली वाहतूक

खलघाट ते इंदूरला जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या 78  किमी अंतरावर थांबवण्यात आलेल्या आहेत. अपघात झाल्यास सावधगिरी म्हणून दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. सध्या हजारो वाहने त्यामुळे रस्त्यांवर थांबलेल्या अवस्थेत आहेत. त्यात अनेक कुटुंबे अडकलेली आहेत.

राजकारणही सुरु

यावरुन आता राजकारणही सुरु झाले आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरलेले आहे. या धरणाच्या कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्त्यांचे म्हणणे आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्र्यांनी केली आहे.