Fertilizers Price Hike : शेतकऱ्यांवर पुन्हा कुऱ्हाड, डिझेलनंतर आता शेती खतही महागणार, 45-58 टक्के वाढ?

| Updated on: Apr 08, 2021 | 11:13 PM

एकिकडे देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अनेक महिन्यांपासून ठाण मांडून आहेत. तर दुसरीकडे आता डिझेल पाठोपाठ शेतीच्या खतांचीही किंमत वाढणार असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी कुऱ्हाड कोसळणार आहे.

Fertilizers Price Hike : शेतकऱ्यांवर पुन्हा कुऱ्हाड, डिझेलनंतर आता शेती खतही महागणार, 45-58 टक्के वाढ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली : एकिकडे देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अनेक महिन्यांपासून ठाण मांडून आहेत. तर दुसरीकडे आता डिझेल पाठोपाठ शेतीच्या खतांचीही किंमत वाढणार असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी कुऱ्हाड कोसळणार आहे. देशभरात युरियानंतर मोठ्या प्रमाणात शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या डाय अमोनियम फॉस्फेटच्या (DAP) 50 किलो खताच्या गोणीची किंमत 1200 वरुन थेट 1900 रुपये होणार आहे. ही वाढ तब्बल 58 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आधीच शेतात उत्पादित मालाला हमी भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होतोय. त्यात आता डिझेल पाठोपाठ खतांच्याही किमती वाढणार असल्याने शेतकऱ्याचं कंबरडं मोडणार आहे. देशातील अनेक शेतकरी संघटनांनी या दरवाढीला जोरदार विरोध केलाय. तसेच रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय (IFFCO publish letter showing fertilizers price hike by 45-58 percent in India).

इंडियन फार्मर फर्टिलायझर कॉर्पोरेशनने (इफको) डीएपी शिवाय नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सल्फरची वेगवेगळी मात्रा असलेल्या इतर खतांच्याही किमती वाढवल्या आहेत. यात 10:26:26 ची किंमत 1,175 वरुन 1,775 रुपये प्रति गोणी, 12:32:16 ची किंमत 1,185 रुपयांवरुन 1,800 रुपये प्रति गोणी आणि 20:20:0:13 ची किंमत 925 वरुन 1,350 रुपये प्रति गोणी झालीय. इफकोच्या या पत्रकावर नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. मात्र, यानंतर कंपनीने जुन्या खतांचा स्टॉक हा आधीच्या किमतीतच विकला जाणार असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे हा स्टॉक संपल्यानंतर या नव्या किमती लागू होण्याची शक्यता आहे.

खत दरवाढीची चर्चा कशी सुरु झाली?

इफकोच्या मार्केटिंग विभागाकडून 7 एप्रिलला एक पत्र जारी करण्यात आलं होतं. संबंधित पत्रामध्ये डीएपीच्या किंमती वाढवण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्या पत्रातील किंमती 1 एप्रिलपासून डीएपी 1900 रुपयांना विकले जाईल, असं म्हटलं होते. संबंधित पत्रावर मार्केटिंग डायरेक्टर योगेंद्र कुमार यांची सही होती.

देशभरातून तीव्र प्रतिक्रियांनंतर इफकोची सारवासारव

दुसरीकडे इफकोनं माध्यमांमध्ये डीएपीच्या किंमती वाढवल्याचा ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार असल्याचं म्हटलं आहे. आमच्याकडे 11.26 लाख मेट्रिक टन रासायनिक खत आहे. शेतकऱ्यांना डीएपी जुन्या किंमतीला मिळेल, असं इफकोनं म्हटलं आहे. ज्या पोत्यांवर नव्या किंमती छापल्या आहेत ते खत विक्रीसाठी नसल्याचा दावा कंपनीचे सचिव डॉ.यू.एस. अवस्थी यांनी केला आहे. इफकोनं जुन्या दरात विक्री रासायनिक खतांची विक्री केली जाईल, असं म्हटलं आहे. मात्र, नव्या दरांचं पत्रक का काढण्यात आलं याबाबत इफकोकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही.

खतांच्या दरवाढीचा संबंध राजकीय पक्ष किंवा सरकारशी जोडण्यास इफकोचा विरोध

विशेष म्हणजे देशभरातून खत दरवाढीविरोधात तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर इफकोने अशी दरवाढ झालीच नसल्याचा दावा केला. तसेच पंतप्रधान कार्यालयाला ट्विटरवर टॅग करत दरवाढीचा राजकीय पक्ष किंवा सरकारशी जोडण्याला इफकोने विरोध केला. इफकोने म्हटलं, “इफकोच्या पत्रावरील किमती या केवळ गोण्यांवर दाखवण्यासाठीच्या तात्पुरत्या किमती आहेत. त्या तशा दाखवणे अनिवार्य आहे. कंपनीकडून खतांच्या गोणींवर दाखवण्यात आलेल्या किमती केवळ तात्पुरत्या आहेत. कंपनीकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या मालाच्या किमतीला अद्याप अंतिम स्वरुप देणं बाकी आहे. असं असलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज आहे.”

निवडणुकीत दरवाढ घोषित केल्याने इफकोवर सरकारचा दबाव असल्याचा आरोप

“खतांच्या किमती वाढण्याला कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा सरकारला जबाबदार धरणाऱ्या ट्विट किंवा बातम्याना आमचा तीव्र आक्षेप आहे. खतांची किंमत नियंत्रणमुक्त आहे. त्यामुळे त्याचा राजकीय पक्ष किंवा सरकारशी काहीही संबंध नाही,” असंही इफकोने नमूद केलंय. त्यामुळेच सोशल मीडियावर इफकोवर ऐन निवडणुकीत दरवाढ घोषित केल्याने सरकारचा दबाव असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच इफको ट्विट करुन सरकारचा किंवा सत्ताधारी पक्षाचा संबंध नसल्याचा दावा करत असल्याचंही बोललं जातंय.

हेही वाचा :

दुष्काळात तेरावा, खतांच्या किंमतीत भरघोस वाढ

FACT CHECK | खरच डीएपीच्या किंमती 300 रुपयांनी वाढवल्या? इफकोनं काय केला दावा?

शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकात सोडली जनावरं!, कापणीचा खर्चही निघणार नसल्यानं बळीराजा हतबल

व्हिडीओ पाहा :

IFFCO publish letter showing fertilizers price hike by 45-58 percent in India